इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हैदराबादमध्ये अतिशय हृदयद्रावक आणि संतापजनक अशी घटना समोर आली आहे. एका पाच वर्षाच्या मुलाला भटक्या कुत्र्यांनी घेरले आणि अक्षरशः लचके तोडून त्याला मारले. या घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य अंबरपेट येथील आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून समोर आले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला असून याद्वारे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मृत चिमुकल्याचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. प्रदीप असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. हा बालक त्याच्या वडिलांसोबत कामावर गेला असताना त्याच्यावर हल्ला झाला. व्हिडिओमध्ये बालक एकटा रस्त्याने जाताना दिसत आहे. तेवढ्यात तीन कुत्रे त्या मुलाकडे धाव घेतात आणि त्याला घेरतात. घाबरलेला मुलगा पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण कुत्रे त्याच्याकडे येतात आणि त्याला जमिनीवर पाडतात.
कुत्र्यांच्या तावडीतून बाहेर पडण्यासाठी चिमुकला धडपडतो. मात्र, कुत्रे त्याचे कपडे खेचू लागतात. जेव्हा जेव्हा तो उठण्याचा आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कुत्रे त्याच्यावर झडप घालतात. आणि त्याला खाली पाडतात. अखेर कुत्रे पूर्णपणे झडप घालून या चिमकल्याचे लचके तोडतात. लचके तोडून हे कुत्रे त्याला कोपऱ्यात ओढत नेतात. अखेर या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे, अनेकांनी सोशल मीडियावर मुलावर झालेल्या हल्ल्याचे व्हिडिओ शेअर केले आहेत आणि अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
https://twitter.com/snehamordani/status/1627923627994742784?s=20
गुजरातच्या सुरतमध्येही भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेला दोन आठवडे उलटत नाही तोच आता हैदराबादमध्ये ही घटना घडली आहे. याआधी, जानेवारीमध्ये बिहारमधील अराहमध्ये एका भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने ८० हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुत्र्यांच्या हल्ल्याच्या वारंवार येत असलेल्या बातम्यांमुळे निवासी सोसायट्यांमध्ये भटक्या कुत्र्यांना आवारात परवानगी द्यायची की नाही यावर वादाला तोंड फुटत आहे. प्राण्यांना खाण्यास दिल्यामुळे अनेकांनी श्वानप्रेमींना टार्गेट केले आहे.
या घटनेबद्दल तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव म्हणाले की, आम्ही आमच्या नगरपालिकांमध्ये रस्त्यावरील कुत्र्यांचा सामना करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही प्राणी काळजी केंद्रे, प्राणी जन्म नियंत्रण केंद्रे तयार केली आहेत. मृत झालेल्या चिमुकल्याप्रती आणि त्याच्या कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना आहे आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ.
आपल्याला सेंद्रिय कचऱ्याची विल्हेवाटही वाढवण्याची गरज असल्याचे मंत्री म्हणाले. तर, आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वकाही नक्कीच करू. कुटुंबाप्रती माझे मनापासून संवेदना, मला माहित आहे की मी बाळाला परत आणू शकत नाही. असे पुन्हा घडू नये यासाठी मी माझ्या क्षमतेनुसार सर्व काही करेन, अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली.
Shocking Viral Video Small Child Beaten by Stray Dog Attack