त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवगाव येथील शासकीय कन्या आश्रम शाळेत एका विद्यार्थिनीला वृक्षारोपणापासून दूर सारण्यात आले. मासिक पाळीच्या काळात वृक्षारोपण या विद्यार्थिनीने करु नये, यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
देवगाव शासकीय कन्या आश्रम शाळेत शेकडो विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. गेल्या आठवड्यात शाळेच्या आवारात वृक्षारोपण सुरु होते. त्याच इयत्ता १२वीच्या एका विद्यार्थिनीची निसर्ग नियमाप्रमाणे मासिक पाळी आलेली होती. त्यावेळी शिक्षकाने त्या मुलीला तू झाड लावू नकोस, कारण झाड जगणार नाही, असे सर्व मुलींसमोर ओरडून सांगितले. ही बाब अतिशय खेदजनक असल्याचे श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी सांगितले आहे.
याप्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त यांच्याशीही फोनवर चर्चा करण्यात आली आहे. शिक्षकाचे अशा प्रकारचे वर्तन हे कायद्याविरुद्ध आहे. त्यात हे शिक्षक बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. हा अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार असून संबंधित शिक्षकां वर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मधे यांनी लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
“स्त्रीला मासिक पाळी आली असतांना झाड लावल्यास झाडाची वाढ होत नाही अथवा ते जळुन जाते. असे समजणे म्हणजे निखालसपणे अंधश्रद्धा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगणे जसे घटनेत कर्तव्य सांगितले आहे तसे शिक्षणाच्या गाभा घटकात सुद्धा त्याची नोंद आहे. शिक्षकाचे सदरचे कृत्य हे त्या विरोधात असल्याने त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. महाराष्ट्र अंनिस सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे”
– कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह ,महाराष्ट्र अंनिस.
Shocking Trimbakeshwar Taluka Tree Plantation Girl Menstruation Trible Girl School Nashik Crime