इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशाला प्राचीन इतिहास असून अनेक राजे महाराजे आणि सम्राट होऊन गेले. सहाजिकच त्यांच्या काळात अनेक मंदिरांमध्ये सोन्या-चांदीच्या तसेच मौल्यवान धातूच्या मूर्ती आणि अन्य महत्त्वाची दुर्मिळ वस्तू होत्या. कालौघात या वस्तूंची चोरी झाली. तसेच काही वस्तू गहाळ झाल्या. सध्या देखील भारतातील अनेक प्रांतात मठ मंदिरे असून तेथे देखील अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान मुर्ती तसेच अन्य ऐवज आहे त्याची देखील चोरी होत असते.
गेल्या काही वर्षात अशा प्रकारे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे या मूर्ती आणि अन्य वस्तू चोरून त्यांचा जाहीरपणे बाजारात लिलाव केला जातो. बिहारमध्ये अलीकडच्या काळात मूर्ती चोरीच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत. यामागे संघटित टोळ्या कार्यरत असून, स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने या घटना घडवत आहेत. नेपाळ हा शेजारी देश चोरीच्या मूर्तींची सर्वात मोठी बाजारपेठ बनला आहे.
आपला शेजारीच शत्रू झाला, तर हातचे वाचवणे अवघड होऊन बसते, असे म्हणतात, अशाच काही धक्कादायक बाबी भारतातील आणि विशेषतः बिहारमधील मूर्ती चोरीच्या संदर्भात समोर येत आहेत. ही माहिती कोणाला मिळत आहे, याचा विश्वास बसत नाही की, शेजारील देशातून असा कट रचला जात आहे. तथापि, याला दुसरी बाजू देखील आहे. ती म्हणजे अंतर्गत सुरक्षा. इतक्या घटना घडूनही आपण मठ-मंदिरातील मूर्ती वाचवण्याच्या दिशेने विशेष काही करू शकलेले नाही. कोणतीही व्यवस्था करू शकलो नाही. देवाच्या मुर्ती देवाच्या हातात सोडल्या आहेत.
मठ आणि मंदिरांमधील दुर्मिळ आणि मौल्यवान देवी-देवतांच्या मूर्तींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. उत्तर बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये सातत्याने मूर्तींची चोरी होत आहे. गेल्या दोन वर्षांत दोन डझनहून अधिक घटना घडल्या आहेत. सीमावर्ती जिल्ह्यांमधून मूर्ती नेपाळमध्ये नेल्या जातात. सीतामढी येथून चोरीला गेलेल्या राम-जानकी आणि लक्ष्मण यांच्या दीडशे वर्ष जुन्या मूर्तींच्या चोरीमागे नेपाळशी संबंधित एका संघटित टोळीचा हात असण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
मूर्ती चोरी आणि तस्करीचे जाळे नेपाळची राजधानी काठमांडूपर्यंत पसरले आहे. तेथून मोठ्या टोळ्यांमार्फत ते इतर देशात पाठवले जातात. चोरांची टोळी आधी मठ आणि मंदिरे फोडते. कालांतराने मूर्ती गायब होतात. यानंतर ते सीमेला जोडलेल्या ग्रामीण रस्त्यांद्वारे नेपाळमध्ये पोहोचवले जातात. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, तस्कर आणि चोरीच्या टोळ्या वेगवेगळ्या गोष्टी करतात. मूर्ती चोरून तस्करांना उपलब्ध करून देणे हे चोरांचे काम आहे.
चोरीच्या मूर्ती विकण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. दि. २८ फेब्रुवारीला गया येथे अटक करण्यात आलेल्या पाच तस्करांसोबत सापडलेल्या मोबाईलमध्येही अनेक मूर्तींची छायाचित्रे सापडली आहेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या १० मूर्ती नेपाळमार्गे इतर देशांमध्ये पाठवण्याची तयारी सुरू होती. रक्सौलमध्ये भारत-नेपाळ सीमा भागातून मूर्तींच्या तस्करीमुळे स्थानिक पोलिसांसह इतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
गतवर्षी २९ जुलै रोजी मुझफ्फरपूरच्या औरई येथील राम-जानकी मंदिरातून माता सीतेची १० किलोची मूर्ती चोरीला गेली होती. ७ ऑक्टोबर रोजी शहरातील आंदिगोला येथील रामजानकी मंदिरातून श्रीकृष्णाच्या दोन मूर्ती चोरीला गेल्या होत्या. सीतामढीच्या सुरसंद येथील राधाकृष्ण मंदिरातून १६ मे रोजी महादेव, दुर्गाजी, लक्ष्मीजी आणि गणेशजींच्या मूर्ती चोरीला गेल्या होत्या. २३ डिसेंबर रोजी मधुबनीच्या राहिका येथे राधा-कृष्णाच्या मूर्ती चोरीला गेल्या होत्या. तर या वर्षी ४ जानेवारी रोजी बेनीपट्टी येथील बंकट्टा येथील रामजानकी मंदिरातून श्री राम, जानकी, लक्ष्मण आणि गणेश यांच्या मूर्ती चोरीला गेल्या होत्या.