इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटकातून अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. याद्वारे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आणि सरकारी रुग्णालयांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. भटक्या कुत्र्याने थेट सरकारी रुग्णालयात घुसून नवजात अर्भकाला ओरबाडून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत अर्भकाचा मृत्यू झाला असून सर्वत्र संतापाचे वातावरण आहे.
शिवमोग्गा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका कुत्र्याने रुग्णालयात घुसून प्रसूती विभागातील नवजात अर्भकाला ओरबाडून बाहेर काढले. चिंताजनक बाब म्हणजे यादरम्यान कोणाचीही नजर कुत्र्यावर पडली नाही. सुरक्षा रक्षकाने बाहेर पाहिले असता त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून बालकाची सुटका केली. तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता.
जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनी सांगितले की, शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील प्रसूती वॉर्डात कुत्रा पळत होता. त्यानंतर त्याने एका अर्भकाला तोंंडातून उचलून नेले. आम्हाला कुत्र्याच्या तोंडात अर्भक दिसले. त्यानंतर आम्ही कुत्र्याचा पाठलाग करुन त्याच्या तावडीतून अर्भकाला सोडविण्याचा प्रयत्न केला. कुत्र्याच्या तावडीतून बालकाची सुटका करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी अर्भकाची तपासणी केली. पण तोपर्यंत अर्भकाचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. मुलाच्या पालकांची अद्याप ओळख पटलेली नाही. शवविच्छेदनानंतरच बाळाच्या मृत्यूची नेमकी वेळ कळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. गर्भवती महिलांच्या नोंदींची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी परिसरातील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयांची तपासणी सुरू केली आहे.
Shocking stray dog infant baby killed government hospital Karnataka