इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हरियाणातील पानिपतमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पानिपतमधील एका खाजगी रुग्णालयात एका भटक्या कुत्र्याने प्रवेश केला आणि नवजात अर्भकाला तोंडातून बाहेर नेत त्याला मारुन टाकले. हॉस्पिटलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.
मंगळवारी याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मध्यरात्री दोन दिवसांचे बालक (मुलगा) आजीच्या शेजारी जमिनीवर झोपले असताना ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्याला रुग्णालयात जाताना कोणीही पाहिले नाही. सेक्टर १३ – १७ पोलिस स्टेशनचे प्रभारी (एसएचओ) विजय कुमार यांनी सांगितले की, कुत्रा हॉस्पिटलमध्ये घुसला आणि आजीसोबत जमिनीवर झोपलेल्या नवजात बाळाला उचलून त्याने बाहेर नेले.
काही क्षणानंतर, बाळ कुठेच सापडत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. याविषयी स्थानिक प्रभारींनी सांगितले की, कुत्र्याने बाळाला बाहेर नेले. डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुत्रा नवजात अर्भकाला तोंडात धरून बाहेर नेताना दिसत आहे. पोलिस स्टेशन प्रभारी विजय कुमार यांनी सांगितले की, मृत मुलाचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशचे आहे. त्याची आई प्रसूतीसाठी पानिपतला आली होती.
या प्रकरणामुळे बाळाच्या नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. कुत्रा थेट रुग्णालयात येऊ कसा शकतो, सुरक्षारक्षक काय करत होते असे संतापजनक प्रश्न विचारण्यात येत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्यांचा आधार घेऊन रुग्णालय प्रशासनाची चौकशी केली जाणार आहे.
shocking stray dog enter in hospital kill infant baby