इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तानातील सिंध प्रांतात एका ग्रामीण आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय निष्काळजीपणा समोर आला आहे. उपचारादरम्यान गर्भात वाढणाऱ्या अर्भकाचे शीर कापून ते ३२ वर्षीय हिंदू मातेच्या गर्भात सोडण्यात आले. महिला मरणासन्न अवस्थेत पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेचा जीव वाचवला. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता सिंध सरकारने वैद्यकीय मंडळाची स्थापना करून चौकशी सुरू केली आहे.
जमशोरो येथील लियाकत युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल अँड हेल्थ सायन्सेसचे स्त्रीरोग विभागप्रमुख प्राध्यापक राहील सिकंदर म्हणाले, की भील येथील हिंदू महिला थारपारकर जिल्ह्यातील एका दुर्गम गावात राहते. आधी ती आपल्या जवळच्या ग्रामीण आरोग्य केंद्रात गेली होती. परंतु महिला स्त्रीरोगतज्ज्ञ केंद्रात उपस्थित नसल्याने अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्यांनी तिच्यावर उपचार सुरू केले.
ते म्हणाले, की आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी शस्त्रक्रियेदरम्यान मातेच्या गर्भात वाढणाऱ्या अर्भकाचे निष्काळजीपणा करत शीर कापून गर्भातच सोडून दिले. यादरम्यान महिलेची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला मिठीजवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात कोणतीच सुविधा उपलब्ध नव्हती. त्यानंतर महिलेला लियाकत युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल अँड हेल्थ सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले.
तिथे नवजात अर्भकाच्या शरीराचा उर्वरित भाग बाहेर काढून घेण्यात आला आणि महिलेचा जीव वाचला. अर्भकाचे शीर गर्भात अडकले होते आणि मातेचे गर्भाशय तुटले होते. मातेचा जीव वाचविण्यासाठी पोटाची शस्त्रक्रिया करून शीर बाहेर काढावे लागले. ही गंभीर चूक लक्षात आल्यानंतर सिंध आरोग्य सेवेचे महासंचालक डॉ. जुमान बहतो यांनी वेगळ्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Shocking Staff cut new born baby head and leave it in women womb Crime