इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एका शाळेत धर्माच्या नावाखाली जबरदस्तीने प्रार्थना बदलल्याचा प्रकार झारखंडमध्ये समोर आला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांनी या संपूर्ण प्रकरणात हस्तक्षेप करत उपायुक्तांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. सरकारी शाळांमध्ये बाहेरचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण गढवा येथील कोरवाडीह येथील मिडल शाळेचे आहे. शाळेमध्ये वर्षानुवर्षे होणारी प्रार्थना बदलण्यासाठी मुख्याध्यापक योगेश राम यांच्यावर गावातील लोकांकडून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे.
दैनिक जागरणमधील वृत्तानुसार, गावकऱ्यांच्या दबावामुळे शाळेत ‘अब दया कर दान’ प्रार्थनेऐवजी ‘तू ही राम, तू ही रहीम प्रार्थना’ सुरू झाली. मुलांना हात जोडून प्रार्थना करण्यासही मनाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुस्लिमबहुल हे गाव आहे. या गावात मुस्लिमांची संख्या ७५ टक्के आहे. त्यामुळे शाळेतील प्रार्थनेचे नियमही आपल्यानुसार करावे लागतील, असे मुस्लिम बांधवांनी सांगितल्याचे बोलले जात आहे. यानंतर मुख्याध्यापकांनी ही माहिती पंचायत प्रमुख आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. गेल्या ४ महिन्यांपासून शाळेतील जुन्या प्रार्थनेच्या जागी विद्यार्थ्यांसाठी नवीन प्रार्थना सुरू करण्यात आल्याचे समोर आले आहे.
आता या प्रकरणी राज्याचे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांनी गढवाच्या उपायुक्तांशी फोनवर बोलून कारवाईचे आदेश दिले आहेत. सरकारी शाळेत असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे ते म्हणाले. विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा चालवल्या जातील. जर एखादे गाव मुस्लिम बहुल असेल किंवा इतर कोणत्याही धर्माचे प्राबल्य असले तरी धर्मानुसार सरकारी शाळेत प्रार्थना करता येणार नाही, असे त्यांनी बजावले आहे.
Shocking school Prayer Change by Muslim People of Village