नवी दिल्ली – देशाच्या राज्यघटनेनुसार राष्ट्रपती, पंतप्रधान हे सर्वोच्च पद आहे. या पदांवरील व्यक्तींची सुरक्षा खूप महत्त्वाची असते. दहशतवादी आणि असामाजिक तत्वांपासून कायम धोका असल्यामुळे या पदांवरील व्यक्तींच्या सुरक्षेत कोणतीही चूक महागात पडू शकते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची गोपनीय माहिती लीक झाली, तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे आपल्याला ठाऊक आहे. अशीच एक राष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या नियोजनामधील चूक उघडकीस आली आणि पोलिस, प्रशासकीय अधिकार्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दौरा होता. त्यांच्या आगमनाच्या एक दिवसाआधीच रात्री सोशल मीडियावर त्यांच्या सुरक्षेचे नियोजन सार्वजनिक झाले होते. लीक झालेल्या ७६ पानांच्या पीडीएफ फाइलमध्ये त्यांचा ताफा, कार्यक्रम आणि सुरक्षेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर अधिकार्यांची नावे, त्यांच्या फोन नंबरसह सविस्तर माहिती देण्यात आलेली होती. एवढेच नव्हे, तर त्यांच्या ताफ्यात कोणती वाहने कोणत्या अधिकार्यांच्या अधिपत्याखाली असतील याचे तपशीलही दिलेले होते.
दहशतवादी कारवायांबद्दल शहरात कधी काय झाले याची माहितीही देण्यात आली होती. ही माहिती सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर पोलिस आणि प्रशासकीय अधिकार्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी या प्रकणाची चौकशी अतिरिक्त पोलिस उपायुक्त (वाहतूक विभाग) राहुल मिठास यांच्याकडे सोपवली होती.
राष्ट्रपती कोविंद यांच्या सुरक्षेचे नियोजन सार्वजनिक झाल्या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेचे नियोजन २४ पोलिस अधिकरी, प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्या दुय्यम कर्मचार्यांना ठाऊक होते. सुरक्षा संबंधित पीडीएफ फाइल सोशल मीडियावर कशी लीक झाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामागे काही षडयंत्र होते की एखाद्याच्या चुकीमुळे व्हायरल झाली, याबद्दल पोलिस मुख्यालयातील कर्मचार्यांची चौकशी सुरू झाली आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्याचे नियोजन करताना राजपत्रित अधिकार्यांची मुख्य भूमिका असते. राष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या नियोजनाची माहिती राजपत्रित अधिकार्यांसह त्यांच्या काही दुय्यम अधिकार्यांना ठाऊक असते. या नियोजनाप्रमाणे अधिकारी कर्माचर्यांची ड्यूडी लावतात. यासंदर्भात कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाही. चौकशीअंती जो दोषी आढळेल त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे अधिकार्यांचे म्हणणे आहे.