प्रतिनिधी, दिंडोरी
माय मरो आणि मावशी जगो, अशी म्हण आहे. पण आई व मावशी या दोन्ही नात्यांना काळिमा फासणारी घटना तालुक्यातील पाडे येथे घडली आहे. सावत्र आई असलेल्या मावशीनेचे मतिमंद मुलाला अंगावर चटके देत अमानुष अत्याचार केल्याच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याद्वारेच ही घटना उघडकीस आला आहे. सदर बालकावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिंडोरी पोलिसांनी या घटनेची दखल घेत कारवाई सुरू केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडे येथील तीन वर्षीय मतिमंद बालकास त्याच्या सावत्र आईने अमानुषपणे मारहाण केली. अनेक ठिकाणी चटके देत अत्याचार केले. ही घटना काही नागरिकांना समजताच त्यांनी बालकास दिंडोरी येथे उपचारासाठी नेले. तेथे उपचार करून पुढे अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सदर सावत्र आई ही त्या बाळाची मावशीच आहे. कौटुंबिक कलहातून या बालकाची आई घर सोडून निघून गेली आहे. आईनंतर सावत्र आई ही मावशीच असल्याने तिची माया त्याला मिळेल ही आशा फोल ठरली आहे. तसेच आई आणि मावशीच्या नात्यालाही या घटनेने काळिमा फासली आहे. त्यामुळे या घटनेने संताप व्यक्त होत आहे. दिंडोरी पोलिसांनी घटनेची दखल घेत कारवाई सुरू केली आहे. सावत्र आई वर्षा राजेंद्र अपसुंदे हिच्या विरोधात भा,दं,वि,कलम 326,324 सह पोक्सो कायदा कलम 10,12 तसेच बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम कायदा कलम 75 व 85 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अनंत तारगे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण तपास करत आहेत.
सावत्र आईने आरोप फेटाळले
घटनेनंतर सावत्र आईच मुलाला घेऊन रुग्णालयात आली. मुलाला चटके दिल्याचा आरोप तिने फेटाळला आहे. हा लहानगा आणि त्याच्या मोठ्या भावामध्ये भांडण झालं, त्यातून ही घटना घडली आहे, असा दावा तिने केला आहे.
—