फिरोजाबाद (उत्तर प्रदेश) – गोरगरीब तसेच आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या तरुण-तरुणींचे विवाह जमण्यास अनेक अडचणी येतात. यातील मुख्य कारण म्हणजे या समारंभास लागणारा प्रचंड पैसा. त्यामुळेच शासकीय योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. परंतु या सोहळ्यातही गैरप्रकार होत असल्याचे दिसून येतात. असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
तुंडला येथे एका तरुणाने सामूहिक विवाह योजनेंतर्गत काही रुपयांच्या लालसेपोटी चक्क आपल्या बहिणीशीच विवाह केला. तपासात ही बाब उघडकीस आल्यानंतर अधिकारीही अचंबित झाले. या तरुणाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच इतर प्रकरणांचा तपास सुरू आहे. यासोबतच लग्नाबाबत जोडप्यांची पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवण्यात आला आहे.
तुंडला गटविकास कार्यालय परिसरात मुख्यमंत्री सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात एकूण ५१ जोडप्यांचा विवाह झाला. या समारंभातील सर्व जोडप्यांना घरगुती साहित्य व कपडे इत्यादी प्रदान करण्यात आले. समारंभातील काही जोडप्यांचे व्हिडीओ व फोटो परिसरातील गावप्रमुखापर्यंत पोहोचले. त्यात उघड झाले की समारंभात बनावट कागदपत्रे बनविण्यात आले. असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले.
एका जोडप्याने तर नात्यातील म्हणजे विवाहित भावाने बहिणीशी लग्न केले होते. याप्रकरणी तपास केल्यानंतर समाजकल्याण विभागाचे सहाय्यक विकास अधिकारी यांनी याविरुद्ध तक्रार दिली आहे. लग्नासाठी आलेल्या जोडप्यांचा शोध घेतला आणि त्यांची पडताळणी केली त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्यात समाधानकारक खुलासा न मिळाल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.
बोगस तथा बनावट पद्धतीने लग्न करणाऱ्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन्ही पती-पत्नी यांच्या आधार कार्डांची पडताळणी सुरू आहे. चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल. तसेच सामूहिक विवाह सोहळ्यात गैरहजर असलेल्या जोडप्यांच्या जागी बनावट विवाह केल्याप्रकरणी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. तपासानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल.