अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बोगस डॉक्टरने तब्बल ४० माणसांना चक्क जनावरांचे इंजेक्शन दिल्याचे उघड झाले आहे. पाथर्डी तालुक्यातील या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पाथर्डी तालुक्यातील खंडोबावाडी येथील हा सर्व प्रकार आहे. आपण स्वतः डॉक्टर असल्याचे सांगत एका व्यक्तीने जनावरांचे औषध वापरून ४० हून अधिक महिला व पुरूषांना पाठ, गुडघा व मानेला इंजेक्शन दिले. या बोगस डॉक्टरला गावातील काही जागरूक तरूणांनी पकडून तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बाबासाहेब होडशीळ यांच्या ताब्यात दिले आहे.
तिसगाव येथे या डॉक्टरांच्या बॅगेतील औषधांची खातर जमा झाल्यानंतर पाथर्डी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राजेंद्र सदाशिव जवंजळे ( रा. जिल्हा बीड) असे पकडण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. करंजी जवळील खंडोबावाडी येथे गेल्या दोन दिवसापासून राजेंद्र जवंजळे हा डॉक्टर म्हणून या गावात आलेल्या व्यक्तीने मानेचे, गुडघ्याचे पाठीचे दुखणे ज्या नागरिकांना आहे त्यांना नेमकी दुखणार्या जागेवरच इंजेक्शन देऊन प्रत्येक व्यक्तीकडून पाचशे रुपये उकळत होता. गेल्या दोन दिवसापासून हा बोगस डॉक्टर या गावातील नागरिकांना इंजेक्शन टोचण्याचे काम करत आहे. गावातील काही तरुणांनी या डॉक्टरच्या बॅगेतील इंजेक्शनच्या बाटल्या तपासल्या असता त्या बाटल्यावर जनावरांची चिन्ह आढळून आली.
सदर डॉक्टर तर माणसाचे आहेत मग औषधांच्या बाटल्यावर जनावरांची चिन्ह कशी? अशी शंका गावातील काही तरुणांना आल्यानंतर त्यांनी करंजी येथील प्राथमिक उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी दिलीप तांदळे यांना बोलावून घेतले. त्यांनी देखील या सर्व औषधांची पाहणी केल्यानंतर या बोगस डॉक्टरला गावातील तरुणांच्या मदतीने तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
या ठिकाणी त्याच्याकडील सर्व औषधांची तपासणी व पाहणी केली असता जनावरांना जी औषध वापरली जातात त्याच औषधांचा प्रामुख्याने माणसांवर उपचार करण्यासाठी वापर करण्यात आला असल्याचे समोर आले.
संबंधित व्यक्तीकडील औषधांचा पंचासमक्ष पंचनामा केल्यानंतर या व्यक्तीला पाथर्डी पोलीस स्टेशनला नेण्यात आले त्या ठिकाणी या बोगस डॉक्टरच्या विरोधात तिसगावचे डॉक्टर बाबासाहेब होडशीळ यांच्या फिर्यादीवरून या बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. या बोगस डॉक्टरला तिसऱ्याच कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पाठवले होते आणि तो हे माणसांच्या जीवाशी खेळणारे काम करत असल्याचे आढळून आले आहे यात आणखी भयानक म्हणजे हा तिसरा व्यक्ती या बोगस डॉक्टर कडून दररोज कमिशन म्हणून एक हजार रुपये घेत होता आता त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे
गेल्या दोन दिवसापासून हा बोगस डॉक्टर या खंडोबावाडी गावातील नागरिकांना इंजेक्शन टोचण्याचे काम करत होता, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. गावातील काही तरुणांनी या डॉक्टरच्या बॅगेतील इंजेक्शनच्या बाटल्या तपासल्या असता त्यांना संशय आल्याने प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आता आरोग्य विभागानेही तातडीने संबंधित उपचार घेतलेल्या नागरिकांची तपासणी सुरू केली असून कुणाला काही त्रास होत असल्यास आरोग्य विभागाशी तातडीने संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अशा पद्धतीने कुणी बोगस डॉक्टर निदर्शनास आल्यावरही आरोग्य विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
Shocking Bogus Doctor Given 40 Persons Animal Injection
Ahmednagar District Pathardi Taluka Tisgaon Crime Health