इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटकात लग्नादरम्यान एका २६ वर्षीय वधूचा स्टेजवर अचानक मृत्यू झाला. या घटनेने विवाह सोहळ्याला उपस्थित सर्वांनाच हादरवून सोडले. या घटनेनंतर वधूच्या पालकांनी आपल्या मुलीचे अवयव दान करून आदर्श घालून दिला आहे. कन्यादानाचे स्वप्न रंगवणाऱ्या माता–पित्यांवर मुलीचे अवयवदान करण्याची वेळ आल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. ही घटना कर्नाटकातील कोलार शहरातील आहे. येथे २६ वर्षीय चैत्राचे लग्न होते. लग्नानंतर आय़ोजित रिसेप्शन कार्यक्रमात चैत्रा वधूच्या रूपात स्टेजवर पोहोचली आणि वरासोबत बसली, तेव्हा ती अचानक बेहोश होऊन स्टेजवर पडली. त्यानंतर लगेच चैत्राच्या नातेवाईकांनी तिला बंगळुरूच्या निम्हान्स रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केले.
चैत्राच्या आई-वडिलांसाठी हा खूप कठीण काळ होता, तरीही अशा परिस्थितीत चैत्राच्या पालकांनी आपल्या ब्रेन डेड मुलीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकचे आरोग्य मंत्री केके सुधाकर यांनी मुलीच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि पालकांच्या निर्णयाचे कौतुक केले. “२६ वर्षांच्या चैत्रासाठी हा मोठा दिवस होता. पण नियतीच्या योजना वेगळ्या होत्या. कोलार जिल्ह्यातील श्रीनिवासपूर येथे त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनदरम्यान ती कोसळली. त्यानंतर त्यांना निम्हान्समध्ये ब्रेन डेड घोषित करण्यात आले. हृदयद्रावक घटना घडूनही तिच्या पालकांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे, जो अतिशय कौतुकास्पद आहे”, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. मुलगी आपल्या भविष्याबद्दल सुंदर स्वप्न रंगवत होती. पण काळाने असा घाला घातल्याने तिच्या कुटूंबियांना शोक आवरणेदेखील कठीण झाले होते. तरीदेखील काळजावर दगड ठेवून त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला यामुळे वैद्यकीय क्षेत्रातूनही त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
https://twitter.com/mla_sudhakar/status/1492179542227574785?s=20&t=YQ7qnPOGEitWo39BabrWFA