पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या आठ दिवसापासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की, त्यांना निमोनिया झालेला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी २९ जुलै रोजी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांची साहित्य संपदा मोठी आहे. राजा शिवछत्रपती, पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांच्या राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या १६ आवृत्ती प्रकाशित झाल्या असून ५ लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत. ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखनही त्यांनी केले आहे. अशा शिवशाहीर बाबासाहेब यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.