मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ता नाट्यात आता पुढचा अंक सुरू होत आहे. शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी आता पुढील राजकारणाने वेग घेतला आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना व्हिप बजावला आहे. तर, आमच्याकडे दोन तृतीयांश संख्याबळ असल्याने आम्हाला हा व्हीप लागू नसल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे. अशा परिस्थितीत काय तोडगा निघणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, शिवसेनेने काढलेला व्हिप हाच सर्वांना लागू होईल. कारण, तो पक्षाने काढलेला आहे. बंडखोर गटाने काहीही म्हटले असले तरी पक्षाचा व्हिप सर्वांना लागू होतो, असे पवार यांनी म्हटले आहे. त्यातच आता या सर्व प्रकरणात विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. विधीमंडळाचे विशेष अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशनात झिरवाळ हे काय भूमिका घेतात तेच महत्त्वाचे ठरणार आहे. जर, त्यांनी शिवसेनेचा व्हिप मान्य केला तर विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान न करणारे आमदार अपात्र ठरु शकतात. किंवा हा प्रश्न कायदेशीरदृष्ट्याही पुढे जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष अधिवेशन सुरू झाल्यावर काय घडते त्यावरच सारे काही अवलंबून असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
Shivsena Whip Rebel Shinde group which is correct