मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना आणि बंडखोर शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसागणिक वाढताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० पेक्षा अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर अनेक सेना पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत आहेत. तर, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांच्या हकालपट्टीचे सत्र सुरू ठेवले आहे.
शिवसेना फुटल्यानंतर पक्ष बांधणी नव्यानं करण्याचा प्रयजोन केलेल्या उद्धव ठाकरेंनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. आता पुणे जिल्ह्यातील शिवसेना नेते व माजी मंत्री विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश जारी केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून राज्यातील वेगवेगळ्या मतदार संघांचा आढावा घेतला जात आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना भवनात बैठकांचा धडाका सुरुच आहे. त्याच वेळी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्व रद्द केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. याआधीच शिवसेनेचे पुण्यातील नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात शिवसेनेला जबर फटका बसला आहे.
विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार असून ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचं प्रतिनिधीत्व करत होते. विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर त्यांच्यावर हकालपट्टी कारवाई करण्यात आली आहे. विजय शिवतारे यांनी आपण शिंदे गटात जात असल्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता.आता पुरंदर तालुक्यात शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पेटण्याची चिन्हा आहेत. शिवतारे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता विजय शिवतारे समर्थक आणि इतर शिवसैनिक यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेतील अनेक नेते कार्यकर्ते रोज शिंदे गटात सामील होत आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून शिंदे गटात जोरदार भरती सुरु आहे. बंड केलेले आमदार आपले शक्ती प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यात करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी ही मोठी हानी ठरण्याची शक्यता आहे. कारण अनेक पालिकेची निवडणूक काही दिवसांवर आली आहे. त्या निवडणुकीत फुटीचे नक्की पडसाद पाहायला मिळतील, असे दिसते.
पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित, वसई तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, वसई तालुका उपप्रमुख तथा माजी नगरसेविका यांचे पती दिवाकर सिंग, काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेले वसई विरार चे माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांच्यासह 50 शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. काल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन समर्थन दाखविले आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागातील शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाण्याची तयारी केली आहे. कारण रोज नव्याने प्रवेश होत असल्याचे जाहीरपणे दिसत आहे. मीरा भाईदरचे अनेक नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे. पालघर जिल्ह्यात येत्या काही महिन्यात पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी तिथं शिवसेनेला सगळी तयारी नव्याने करावी लागणार आहे.
औरंगाबादचे युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. राजेंद्र जंजाळ यांनी पक्षाच्या विरुद्ध काम केल्याने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टीची घोषणा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी युवा सेनेच्या निष्ठा मेळाव्यात केली आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे शिरुर येथील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचीही पक्षाने हकालपट्टी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देणारी पोस्ट त्यांनी सोशल मीडियात शेअर केली होती. तसेच सामना दैनिकात बातमी प्रसिद्ध झाली होती, मात्र आपण शिक्सेनेच असल्याचे आढळराव यांनी सांगितल्याने, बातमी अनावधानाने दिल्याचे म्हटल होते, मात्र त्यानंतर आढळराव यांनी हकालपट्टीच्या बातमीवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. शिवसैनिकांनी भूलथापांना बळी पडू नये, असे तेव्हा म्हटले होते.
ठाण्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत जिल्हाप्रमुखपदी म्हस्के यांच्या पुनर्नियुक्तीची घोषणा केली. त्यानंतर शिवसेनेने हे वृत्त निराधार असून म्हस्के यांचा शिवसेनेशी काही संबंध नाही. शिवसैनिकांनी भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन करत पक्षप्रमुखांच्या आदेशाशिवाय शिवसेनेत कुणीही कुणाची नियुक्ती करू शकत नाही असे स्पष्ट केले आहे.
Shivsena Vs Shinde Group Politics Uddhav Thackeray Eknath Shinde