मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेतील बंड आता थंड झाल्याचे दिसत असले तरी पक्षांतर्गत मतभेद अद्याप सुरुच आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे पक्ष संघटनेवर भर देत असून पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन ते आपली भूमिका मांडत आहे. हे सगळे प्रयत्न सुरु असतानाच आमदार राजन साळवी हे देखील नाराज असल्याचे आता समोर आले आहे.
गेल्या काही काळात शिवसेना आणि बंडखोर आमदार राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. आता आमदार साळवींच्या नाराजीमुळे पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. साळवींच्या नाराजीला कारण ठरले आहे ते बारसू, सोलगाव येथे उभारली जाणारा रिफायनरी प्रोजेक्ट. राजापूरातील बारसू आणि सोलगाव येथे रिफायनरीचा प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. या प्रोजेक्टला शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी समर्थन दिले आहे तर शिवसेना आणि पक्षप्रमुखांचे मत हे वेगळे आहे.
शिवाय राजन साळवींनी घेतलेल्या समर्थनाच्या भूमिकेवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. तर रिफायनरीला साळवेंचे समर्थन हे त्यांचे वैयक्तीक मत असल्याचे काही शिवसेना नेते सांगत आहेत. पण स्थानिक जनतेची भावना लक्षात घेता याला विरोध होणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे. यावरुन पक्षनेतृत्व आणि राजन साळवी यांच्यात मतभेद असल्याचे समोर आले आहे.
साळवी यांनी या रिफायनरीला समर्थन दर्शवले असून त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेचे नेतृत्व नाराज झाले आहेत. त्यामुळे आता पक्षश्रेंष्ठींनी जर रिफायनरीला विरोध केला तर राजन साळवी आपली राजकीय भूमिका काय घेणार हे पहावे लागणार आहे. त्यामुळे एकीकडे सावरासावरी सुरु असतनाच अशा नाराजांना रोखण्याचे आव्हानदेखील ठाकरेंसमोर आता आहे.
रिफायनरीला विरोध किंवा समर्थन यापेक्षा स्थानिकांचे म्हणणे काय आहे हे बघणे महत्वाचे असल्याचे शिवसेना खा. विनायक राऊत म्हणाले. तर शिवसेना ही स्थानिक जनतेच्या बाजूने असल्याचेही ते म्हणाले आहे. राजन साळवींचा विरोधाचा विचार केला तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनीच राजापूरच्या बारसू, सोलगाव इथं रिफायनरी प्रकल्प करण्यास हिरवा कंदील दाखवला होता. आता विरोधाची भूमिका शिवसेना घेत असल्याने गुंतागुंत वाढली आहे.
शिवसेना नेतेपदी भास्कर जाधव आणि अरविंद सावंत यांची वर्णी लागलेली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांची निवड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. भास्कर जाधव यांची वर्णी राजन साळवी यांच्या नाराजीचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे साळवी आता काय निर्णय घेतात, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Shivsena Uddhav Thackeray Senior Leader Politics