मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सत्ता गमावलेल्या उद्धव ठाकरेंसमोर आता राजकीय अस्तित्व वाचवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. शिवसेनेचे ४१ आमदार एकनाथ शिंदे गटाच्या पाठीशी असून केवळ १४ आमदार उद्धव ठाकरेंसोबत आहेत. आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल १५ खासदारही जाण्याची चिन्हे आहेत. बुधवारी रात्री उशिरा या खासदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. आमदारांपाठोपाठ दोन तृतीयांश खासदारही फुटल्यास संसदेतही शिवसेनेचे गटनेते पद जाणार असल्याची चिन्हे आहेत.
उद्धव ठाकरेंच्या कठीण काळात खासदारांच्या शिंदे भेटीमुळे १९ पैकी तब्बल १५ लोकसभा खासदार त्यांची साथ सोडणार का, अशी अटकळ जोर धरू लागली आहे. त्यापैकी एक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत. याशिवाय बंडखोर खासदार भावना गवळी यांची यापूर्वीच शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या मुख्य व्हीप पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्या शिंदे गटासोबतच आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीला अवघा थोडाच अवधी उरला आहे. त्याआधीच उद्धव ठाकरे यांना एकावर एक जबर धक्के बसत आहेत. त्यामुळे त्यांच्या चिंता दिवसागणिक वाढत आहेत. ठाण्यातील ६७ पैकी तब्बल ६६ शिवसेना नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय इतर अनेक जिल्ह्यातूनही बंडाचे आवाज ऐकू येत आहेत.
बुधवारी रात्री शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला शिवसेनेचे १९ पैकी १५ खासदार उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या खासदारांनीही एकनाथ शिंदे यांना साथ दिली, तर उद्धव ठाकरेंचा आगामी राजकीय प्रवास आणखी खडतर होणार आहे. खासदारांच्या दबावाखाली शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. असे असतानाही खासदार शिंदेंसोबत जाण्याच्या तयारीत आहेत.
भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी या खासदारांकडून उद्धव ठाकरेंवर दबाव आणला जात असल्याचे वृत्त होते. या प्रश्नासंदर्भात या खासदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची शक्यता आहे. शिवसेना सदस्य हे ‘मातोश्री’ म्हणजेच ठाकरे कुटुंबियांचा आदेश अंतिम मानत असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तशी प्रथा निर्माण केली. पण आता ठाकरेंच्या हातून पक्षही जातो की काय, अशी स्थिती निर्माण होत आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या बंडाने आता चित्र बदलत आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान देत दोन तृतियांशपेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन आपण किती कणखर झालो आहोत हे दाखवून दिले आहे. आता त्यांनी आपला मोहरा खासदारांकडे वळविला आहे.
आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने केला जात आहे. आमदारांपाठोपाठ खासदार शिंदे गटात सामील झाल्यास उद्धव ठाकरेंचे राजकीय अस्तित्व डळमळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे गेल्या अडीच वर्षांपासून भाजपवर टीका करत असताना, बंडखोर शिंदे गट आता भाजपच्या मदतीने राज्यात सत्तेवर आला आहे.
Shivsena Uddhav Thackeray Major shake MP Rebel Shinde Group