मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात गेल्या महिन्याभरापासून अनुत्तरीत असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही, याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि बंडखोर शिंदे गटाच्यावतीने मुंबई महापालिकेकडे अर्ज करण्यात आला होता. महापालिकेने महिनाभर त्यावर काहीही निर्णय घेतला नाही. अखेर उद्धव ठाकरे यांच्यावतीने न्यायालयात धाव घेण्यात आल्यानंतर महापालिकेने दोन्ही अर्ज नाकारले. मात्र, आज उच्च न्यायालयाने निकाल देताना उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे.
दसरा मेळाव्यावरुन गेल्या दीड महिन्यांपासून राज्याचे राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्यासाठी त्यांना हा दसरा मेळावा घेता येऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र, अखेर विजय सत्याचा होतो, अशी प्रतिक्रीया शिवसेना नेत्यांनी दिली आहे. तसेच, शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी दोन मेळावे होणार असल्याने ही बाब राज्याच्या इतिहासात नोंदवली जाणार आहे. तसेच, या मेळाव्याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
मुंबई उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट यांच्यावतीने घमासान युक्तीवाद करण्यात आला. अनेक तास ही सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली. तर, उद्धव ठाकरे यांना २ ते ६ ऑक्टोबर दरम्यान दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावीतीने सर्वप्रथम अर्ज करण्यात आल्याने त्याचा विचार न्यायालयाने केला. त्यानुसार ही परवानगी देण्यात आली. त्यामुळे येत्या दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधणार आहेत. शिवसेनेने या निकालाचे स्वागत केले आहे. उद्धव ठाकरे यांचा हा मोठा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava High Court Order
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/