मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवसेंदिवस उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढत आहेत. तब्बल ४० पेक्षा अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. ही बाब लक्षात घेत उद्धव यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सेनेच्या विदर्भातील खासदार भावना गवळी यांची लोकसभेतील शिवसेना मुख्य प्रतोद (व्हीप) पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेनेत मोठ्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहे. तसेच, शिंदे सरकारने बहुमतही सिद्ध केले आहे. यानंतरही शिवसेनेतील अंतर्गत कलह संपलेला नाही. आमदारांपाठोपाठ आता खासदारही मोठ्या संख्येने पक्षनेतृत्वाविरोधात बंडखोरी करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, एका नव्या घडामोडीत पक्षाने खासदार भावना गवळी यांची लोकसभेतील शिवसेनेच्या मुख्य व्हीप पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राजन विचारे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना संसदीय पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पक्षाच्या या निर्णयाची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्राद्वारे दिली आहे.
संजय राऊत यांनी पत्रकात लिहिले आहे की, ‘शिवसेनेच्या संसदीय पक्षाने लोकसभेतील भावना गवळी यांच्या जागी राजन विचारे यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केल्याचे आपणास कळविण्यात येते. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू होणार आहे. या निर्णयामुळे विधिमंडळ पक्षात फूट पडल्यानंतर आता शिवसेनेच्या संसदीय पक्षातही संघर्षाची शक्यता बळावली आहे. खरे तर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यात एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे भावना गवळींनी म्हटले होते. तेव्हापासून शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदे गटासोबत जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. यामध्ये भावना गवळी यांचे नाव आघाडीवर आहे.
कदाचित त्यामुळेच शिवसेनेने त्यांना मुख्य व्हीप पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयावर भावना गवळींची काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागेल. भावना गवळी आणि खासदार एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेकांच्या वतीने बंडखोरी जाहीर केली जाऊ शकते. मंगळवारी शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरेंना पत्र पाठवले आहे. त्यात राहुल शेवाळे यांनी भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
क्रॉस व्होटिंगची भीती
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना शिवसेनेने पाठिंबा दिल्यास बंडखोरी होऊन क्रॉस व्होटिंग होऊ शकते, हे खासदारांच्या मनोवृत्तीवरून स्पष्ट झाले आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या समर्थनार्थ १६ पैकी १२ खासदार मतदान करू शकतात. तसे झाल्यास शिवसेनेच्या संसदीय पक्षातही मोठी पडझड होण्याची ती नांदी ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
Shivsena Uddhav Thackeray Action on MP Loksabha Whip Post