नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी ठाकरे गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेला असतांना दुसरीकडे ठाकरे गटानेही धक्का दिला आहे. बुधवारी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी मातोश्री येथे त्यांच्या सहकाऱ्यांसह ठाकरे गटात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना संघटक एकनाथ पवार, खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि इतर पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते. याअगोदर अव्दैय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
अपूर्व हिरे हे नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून इच्छुक होते. पण, महायुतीत ही जागा भाजपलाच कायम राहिल्यामुळे त्यांनी अजित पवार गटाला रामराम ठोकला. या मतदार संघातून ठाकरे गटाने सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे बळ येथे वाढले आहे.
माजी आमदार कल्याणराव पाटील अजित पवार गटात
येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.