नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : मुंबईच्या माहीम विधानसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिला असून त्यामुळे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची लढाई अवघड झाली आहे. या मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवार दिली आहे. तर ठाकरे गटाने महेश सावंत यांना संधी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेशी संबधीत असलेल्या या तीन्ही पक्षात तिरंगी लढत होणार आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांना ६१ हजार ३३७ मते मिळाली होती. तर मनसे नेते संदीप देशपांडे यांना ४२ हजार ६९० मते मिळाली होती. आता २०२४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन गट मनसे समोर असणार आहे. त्यामुळे मनसेला फायदा होतो की तोटा हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.
गेल्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा उमेदवारी केल्यानंतर मनसेने त्यांच्या विरुध्द उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे अमित ठाकरे विरोधात उमेदवार शिवसेना ठाकरे गट देणार नाही असे बोलले जात होते. पण, शिवसेना ठाकरे गटाने या ठिकाणी उमेदवार घोषीत केल्यामुळे ही निवडणूक आता तिरंगी होणार आहे.