मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेतील अनेक बाबी समोर येत आहेत. सेनेचे खासदार, माजी आमदार आणि अन्य नेतेही फुटणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता यासंदर्भात शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी अधिकृत माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, “विधानसभा पक्ष हा राजकीय पक्षापेक्षा वेगळा आहे. विधिमंडळ पक्षातील सर्व नेते किंवा व्हिप पक्षाध्यक्ष नियुक्त करतात. त्यामुळे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तरी पक्ष टिकेल. दोन खासदार वगळता आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच आहोत.
बंडखोर शिवसेना आमदारांमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरुन पायऊतार व्हावे लागले. शिवसेनेत फूट पडली आहे. मात्र, पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि नावावरून सुरू असलेला वाद अद्याप भारतीय निवडणूक आयोगाकडे अधिकृतपणे पोहोचलेला नाही. निवडणूक आयोग हे पक्ष विभाजन आणि अशा वादांची स्वत:हून दखल घेत नाही. आतापर्यंत शिवसेनेतील एकही गट आयोगाकडे पोहोचलेला नाही.
कोणत्याही गटाने ताबडतोब आयोगाशी संपर्क साधला नाही, त्यामुळे सध्याची परिस्थिती कायम राहू शकते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आगामी निवडणुका पाहता, ही लढत लवकरात लवकर निवडणूक आयोगापर्यंत पोहोचू शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाद्वारे घेतल्या जाऊ शकतात, परंतु निवडणूक आयोगाने दिलेले चिन्हच त्यात वापरले जाते. चिन्ह हे अनेक बाबतीत चिंतेचे कारण असू शकत नाही, परंतु बीएमसी निवडणूक ही शिवसेनेसाठी विश्वासार्हता, प्रतिष्ठा आणि भविष्यकाळ यासाठीची लढाई आहे.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडून निवडणूक आयोगाला पत्र आले असून, त्यात उद्धव ठाकरे यांची पक्षाध्यक्षपदी निवड निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीने एकनाथ शिंदे गटाच्या अशा कोणत्याही हालचाली टाळण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरण्यास कोणत्याही गट किंवा व्यक्तीला मनाई करणारा ठराव यापूर्वीच मंजूर केला आहे.
शिवसेनेच्या घटनेनुसार, पक्षप्रमुखाची नियुक्ती प्रतिनिधी सभागृहाद्वारे केली जाते, ज्यात खासदार आणि आमदारांव्यतिरिक्त जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख आणि पक्षाचे इतर कार्यकर्ते असतात. २०१८ मध्ये लोकप्रतिनिधी सभागृहाच्या २८२ सदस्यांच्या संमतीने उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले. सद्यस्थितीत उद्धव ठाकरेंच्या गटाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शिंदे गटाला बहुतांश आमदारांचा पाठिंबा आहे. खासदारांनी त्यांचे पत्ते उघडलेले नाहीत. मात्र, दोन खासदार फुटल्याचे चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. हे दोन खासदार नक्की कोण हे स्पष्ट झाले आहे. एक म्हणजे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे. तर दुसऱ्या खासदारामध्ये विदर्भातील खासदार भावना गवळी या असल्याचे सांगितले जाते. कारण, त्यांच्यामागे सक्तवसुली संचालनालयाचे चांगलेच शुक्लकाष्ट लागले होते. त्यामुळेच त्यांनी भाजपसोबत जावे, असे खुले पत्र उद्धव यांना लिहिले होते. आता ईडी प्रकारणात त्यांच्या निकटवर्तीयाला जामीनही मिळाला आहे. त्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी हे दोन खासदार फुटल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, पक्षाध्यक्ष कोणत्याही व्यक्तीला पक्षात काढून टाकू शकतो किंवा जोडू शकतो आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जातो. सध्या राष्ट्रीय कार्यकारिणीत १२ सदस्य आहेत. शिंदे यांना नुकतेच राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आले आहे. संविधान बदलण्याचा किंवा एखाद्या व्यक्तीला काढून टाकण्याचा कोणताही निर्णय राष्ट्रीय कार्यकारिणीत घेतला जाऊ शकतो. असे शिवसेनेच्या घटनेमध्ये नमूद केले आहे.
Shivsena Two MP Rebel Crisis Priyanka Chaturvedi confirmation