इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सिंधू नदीचे पाणी रोखणार असे भारत सरकारने म्हटले आहे. पण त्याला २० वर्ष लागेल असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले. ते म्हणाले की, सिंधू नदीचे पाणी रोखण्यासाठी भारत सरकारकडे कोणतीही व्यवस्था नाही. जनतेला मुर्ख बनवले जात आहे असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने या वक्तव्याचा व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे. की शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोदी सरकारचं पितळ उघडं पाडलं.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलली आहे. पाकिस्तान नागरिकांना पुढील ४८ तासांमध्ये देश सोडण्याचे आदेश दिले. तसेच अटारी बॅार्डर १ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय भारताने घेतला. भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर भारताने पाकिस्तानाची पाणी कोंडी केली. सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिली. त्यामुळे पाकिस्तानला हा मोठा दणका बसला असल्याचे बोलले जात होते. पण, त्यावर आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
पाकिस्तानच्या सधन असलेल्या पंजाब प्रांतासह मोठा प्रदेश सिंधू नदीच्या खो-यात वसतो. पाकिस्तानमधीळ शेती असो किंवा उद्योग हे सिंधू नदीच्या खो-यात वसले आहेत. या नदीमुळे पाकिस्तानची शेती फुलली आहे. तसेच अनेक मोठे जलविद्युत प्रकल्प याच नदीवर आहेत. या कराराला भारताकडून आधीही विरोध होत होता. कारण सिंधू नदीच्या वरच्या भागात यामुळे भारताला कोणतेही धरण बांधता येणार नाही असे त्या करारात म्हटले आहे. त्यामुळे या नदीचा जास्तात जास्त फायदा हा केवळ पाकिस्तानचा होतो. पण, आता या कराराला स्थगिती दिल्यामुळे त्याचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार असल्याचे बोलले जात होते. पण, सिंधू नदीचे पाणी रोखण्यासाठी त्याला २० वर्षे लागेल असे म्हटले आहे.
असा आहे करार
या करारात २० टक्के पाण्याचा वापर भारताला आणि ८० टक्के पाण्याचा वापर हा पाकिस्तानचा करता येणार होता. या पाणी वाटपामध्ये भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी दोन्ही देशांमध्ये सिंधू आयोगाची निर्मिती करण्यात आली होती. पाकिस्तान या मुद्दयावर जागितक बँकेकडे किंवा आंतराष्ट्रीय न्यायालयात दाद मागू शकतो.