मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्तांतरात सर्वांत मोठी भूमिका निभावणारे गुवाहाटी प्रकरण संपूर्ण देशाला पाठ झाले आहे. या प्रकरणात उद्धव यांची साथ सोडून शिंदे यांच्या गटात सामील होणारे चेहरे चोवीस तास वाहिन्यांवर झळकत होते. अनेकांना धक्के देणारा तो काळ होता. अश्यात एक आमदार गुवाहाटीसाठी निघाले पण तिथे न पोहोचता मुंबईत परत आले. ते शिंदे गटात सामील झालेच नाहीत. पण आता त्यांना एसीबीची नोटीस आल्यामुळे राजकीय वर्तुळात जबरदस्त चर्चा रंगायला लागली आहे.
आपण उद्धव यांच्या कार्यकर्त्यांपासून लपून गुवाहाटीला कसे पोहोचलो, याची कहाणी सांगणे सगळे आमदार सध्या शिंदे गटात अर्थात राज्य सरकारमध्ये आहेत. पण एक आमदार त्यावेळी सुरतहून परत आले आणि त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार टिका केली होती. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. आता मात्र उद्धव ठाकरे सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले, याला सहा महिने उलटले आहेत. सहा महिन्यांनंतर हळूहळू जे घडले त्याच्या पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. नितीन देशमुख यांना एसीबीची नोटीस आली असून १७ जानेवारीला प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मालमत्तेबाबत जबाब नोंदविण्यासाठी हजार राहावे लागेल, असे एसीबीने नोटीशीत म्हटले आहे.
यापूर्वी गुन्हे दाखल
नितीन देशमुख यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले. तर नागपूर अधिवेशनात त्यांच्यावर कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हे होऊन फार दिवस होत नाहीत, तर आता एसीबीची नोटीस आली आहे. त्यामुळे नितीन देशमुख यांच्यासह उद्धव सेनेतील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
तक्रार कुणी केली?
एसीबीची नोटीस आली आहे, त्यानुसार प्रत्यक्ष हजर राहून चौकशीला सामोरे जाणार. पण तक्रार कुणी केली हे तर कळायला हवे. एसीबीने देखील कुठल्या मालमत्तेच्या संदर्भात आपण चौकशी करणार आहोत, याचे कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही, असा आक्षेप आमदार नितीन देशमुख यांनी नोंदवला आहे.
वर संपर्क साधा
सुरुवातीला एसीबीची नोटीस आली तेव्हा वर संपर्क साधण्याचा सल्ला मला देण्यात आला होता. आता वर म्हणजे कुठे आणि कुणाला संपर्क साधायचा, हे मात्र सांगण्यात आले नाही. पण नेमका कुणाला संपर्क करण्याचे सूचविण्यात आले आहे, हे सर्वांनाच चांगले ठावूक आहे, असेही आमदार नितीन देशमुख म्हणाले.
Shivsena Thackeray Group MLA Nitin Deshmukh ACB Notice