मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार यांनी उघडपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध मोहिम उघडलेली दिसून येते. परंतु त्याचबरोबर काहीजण समन्वयाची भाषा देखील बोलत आहेत. आम्हाला सन्मानाने बोलाविले तर परत येऊ, परंतु भाजपशी देखील बोलणी करावी लागेल, अशी अट घालत बंडखोर आमदार उद्धव ठाकरे यांना आवाहन केले आहे. परंतु या आवाहनाला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून प्रत्युत्तर देण्यात आले आहे, ‘ सन्मानाने बोलवायचे म्हणजे नेमके काय करायचे?’ असा सवाल उपस्थित करीत अग्रलेखातून बंडखोर आमदार, विद्यमान मुख्यमंत्री तसेच भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे हा शिवसेनेतील सामना दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. बंडखोर आमदार पुन्हा शिवसेनेत परतावेत, यासाठी उद्धव ठाकरेंनी हाक दिलेली होती. यावरुन शिंदे गटातील आमदारांनी आता वक्तव्य केले, त्या वक्तव्याचा समाचार सामना अग्रलेखातून घेण्यात आला. “मातोश्रीचे दरवाजे सन्मानाने उघडले तर आम्ही आनंदाने परत येऊ” असं वक्तव्य करणाऱ्या बंडखोर शिवसेना आमदाराला शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘दरवाजे सन्मानाने उघडायचे म्हणजे नक्की कसे काय करायचे? ‘मातोश्री’ ची परंपरा व संस्कार असा आहे की तेथे सगळ्यांचाच सन्मान होतो’ अशा शब्दांत टोला लगावण्यात आला आहे. यावेळी पुन्हा एकदा भाजपवर सामनातून टीका करण्यात आली.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत भाजपवर सामानातून निशाणा साधण्यात आला आहे. या अग्रलेखात असे म्हटले की…
‘मातोश्री’ची परंपरा व संस्कार असा आहे की तेथे सगळ्यांचाच सन्मान होतो. दरवाजे उघडेच असतात व दाराबाहेरील चपलांचे डिगारे हे ‘मातोश्री ये वैभव आणि श्रीमंती आहे. हे जे काही कथित बंड वगैरे झाले त्याच्या पहिल्या दिवसापासून उद्भव ठाकरे एका तळमळीने आवाहन करीत आहेत की, “शिवसेना हे कुट्य आहे. मातोश्री तुमचे हक्काचे घर आहे. परत फिरा घरी या” यापेक्षा सन्मानाने बोलविण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे काय? भाजपला शिवसेनेचा पराभव करायचा नसून शिवसेना संपवायची आहे व पाहुण्याच्या चपलेने विंचू मारायचा आहे. पण विंचवाचा व विष जहाल असते. इंगळी डसली की काय होते ते डोंगर-दऱ्यातले राजकारण करणाऱ्यांना समजते.
त्याचप्रमाणे महुआ मोईत्रा आणि नुपूर शर्मा यांच्यावर केलेल्या कारवाईवरुन हिंदुत्वाचा मुद्दाही सामना अग्रलेखातून शिवसेनेने खोडून काढला आहे. ‘हिंदुत्व’ म्हणजे धर्मांधता किंवा दंगलींचा माहोल निर्माण करून निवडणुका जिंकायच्या असे नसते बाबांनो. पैगंबर साहेबांच्याबाबत अपशब्द उच्चारल्यावर भारतीय जनता पक्षालाही नुपूर शर्मापासून हात झटकावे लागले. तिला पक्षातून काढावे लागले, असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
दुसरीकडे प. बंगालात ममता बॅनर्जी यांनी त्यांच्याच खासदार महुआ मोईत्रा कारवाई केली. का? तर महुआ यांनी कालीमातेवर एक टिप्पणी केल्याने हिंदूंच्या भावना भडकल्याची बोंब भाजपने मारली. ममतांनी श्रीमती मोवर कारवाई केली. या कारवाईमुळेही तृणमूल काँग्रेसचा ‘सेक्युलर’ वाद धोक्यात आला नाही, अशा शब्दांत निशाणा साधला आहे. सर्व आमदार पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे गेले तर जनता त्यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. हे या बंडखोरांना कळत नाहीय. त्यामुळे शिवसेनेचे हे कथित बंडखोर आमदार आणि माननीय पुन्हा आपल्या स्वगृही परतण्यासाठी अटी घालत आहेत. यातून काय समजायचे? त्यांना खरेच यायचे आहे का? कारण आज जे भाजपचे नेते त्यांची काळजी घेण्याचा जो देखावा करत आहेत ते गरज संपताच पुन्हा कचराकुंडीत फेकून देतील. ही भाजपची परंपरा आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.
Shivsena Stand on Rebel MLA Return in Party Saamana Politics Uddhav Thackeray Eknath Shinde