मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी तसेच स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअॅपवर धमकी मिळाल्याचे वृत्त आहे. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू अशी धमकी अज्ञाताने दिली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी यासंदर्भात पोलिसांकडे रितसर तक्रार केली आहे.
नार्वेकर यांच्याकडे संशयितांनी नेमकी कोणती माहिती मागितली आणि कुठल्या मागण्या केला याचा तपशील अद्याप हाती आलेले नाहीत. परंतु चौकशी मागे लावण्यासाठी धमकी देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. ते शिवसेनेचे सचिवही आहेत. अनेक वर्षांपासून ते उद्धव यांच्या सोबत काम करीत आहेत. गटप्रमुख ते पक्ष सचिव आणि त्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुखांचे स्वीय सहायक असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. अत्यंत हुशार आणि प्रभावी संवाद कौशल्य त्यांच्यात आहे.
दरम्यान नार्वेकर यांनी कोणतीही परवानगी न घेता दापोलीत समुद्र किनारी बंगला बांधला आहे, असा आरोप भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी केला होता. त्यांनी दापोलीत मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर ७२ गुंठा जागा घेताना कोणतीही परवानगी घेतली नाही. जंगलतोड करून मोठे उत्खननही सुरू असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.