मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्षाने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक असा विजय प्राप्त केला. याच विजयाचा ‘शिवोत्सव’ गुरुवारी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या जयंतीदिनी मोठ्या जल्लोषात शिवसेना शिंदे गटाने मुंबईतील बीकेसी मैदान येथे साजरा केला. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तमाम शिवसैनिकांच्या साक्षीने पार पडलेल्या या सोहळ्यात गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक असा निर्धार व्यक्त करत ‘शिवकार्य सदस्य नोंदणी अभियाना’चा शुभारंभ करण्यात आला.
गेल्या अडीच वर्षांत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने महाराष्ट्राच्या विकासाला गती दिली. याच विकासकामांची पोचपावती जनतेने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतरूपी आशीर्वादाने शिवसेनेला दिली. विजयाचा हाच भव्य उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांच्या शुभहस्ते शिवसेनेच्या सर्व विजयी शिलेदारांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. तर ज्या लाडक्या बहिणींमुळे शिवसेनेला आणि महायुतीला निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले. त्या लाडक्या बहिणींच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदे विशेष सन्मान करण्यात आले.
या शिवत्सोव सोहळ्यात बोलतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयामुळे खरी शिवसेना कोणाची आहे. हे जनतेने दाखवून दिले आहे. त्यामुळे ज्यांनी खुर्चीसाठी वंदनीय बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले. त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागायला हवी, वंदनीय बाळासाहेब, गुरुवर्य आनंद दिघे साहेबांचा विचार जपत आपल्या शिवसेनेची यशस्वी वाटचाल अविरतपणे सुरू ठेवावी, त्याचबरोबर लोकसभा, विधानसभेत मिळालेल्या यशापाठोपाठ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही घवघवीत यश मिळवून विजयाचा भगवा पुन्हा एकदा फडकविण्याचा संकल्प यावेळी त्यांनी केला.