नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर बंडखोर शिंदे गटाने आता आक्रमकरित्या वाटचाल सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील वाद यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यातच आता शिंदे गटाने आता तातडीने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावा, असं या याचिकेत म्हणण्यात आले आहे. तसेच ‘खरी’ शिवसेना कोणत्या गटाची आहे, याचा निर्णय निवडणूक आयोगाला ठरवू द्या, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बंडखोर’ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकांवर निवडणूक आयोगाला कोणताही निर्णय घेण्यापासून रोखण्याची मागणी ठाकरे गटाने गेल्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केली होती. ‘खरी शिवसेना कोणती’ हा प्रश्न आधीच निवडणूक आयोगाकडे आहे. त्यांनी आठ ऑगस्टपर्यंत दोन्ही गटांकडून पुरावे मागवले असून, त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून नवी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात सध्या यासंबंधी काही याचिका प्रलंबित असल्याने निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या कार्यवाहीस स्थगिती देणे गरजेचे आहे.
न्यायालयापुढे असणाऱ्या याचिका निष्फळ ठरू नयेत,’ अशी विनंती ठाकरे गटातर्फे सिब्बल यांनी केली होती. दुसरीकडे शिवसेनेचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार कोणत्या गटास आहे, पक्षचिन्ह कोणत्या गटास मिळायला हवे हे निश्चित करण्यासाठी निवडणूक आयोग कार्यवाही करत आहे’, असा युक्तिवाद शिंदे गटातर्फे एन. के. कौल यांनी केला. दोन्ही बाजूच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर ठाकरे गटाच्या निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेवर १ ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यास खंडपीठाने संमती दर्शवली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने ३ ऑगस्ट ही नवी तारीख दिली आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षावर नेमका अधिकार कुणाचा असा प्रश्न निर्माण झाला. कारण शिंदे गटाने शिवसेना आमचीच आणि धनुष्यबाणही आमचाच असा दावा केला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं भविष्य काय पक्षावर नेमका कुणाचा अधिकार असा प्रश्न विचारला जाऊ लागला. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. आता शिंदे गट पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात गेला. शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करण्यात आली आहे.
त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार सांगत आहेत की, आम्ही घेतलेला निर्णय हा योग्यच आहे. त्यामुळेच हजारोंच्या संख्येने जनसागर रस्त्या रस्त्यावर चौका-चौका स्वागत करतोय शुभेच्छा, आशीर्वाद देत आहेत. आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर यापैकी कोणीच आले नसते. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही पुढे जातोय. राज्यातील जनतेला तेच हवं होतं. त्यांच्या मनात ते आहे तो विचार आम्ही बोलून दाखवलाय. जनतेच्या मनातला मुख्यमंत्री, आमच्या मनातला मुख्यमंत्री असे लोक बोलत आहेत. त्यामुळे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांचे आभार मानतो.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात शिवसेनेच्या मालकीवरून सुरु असलेल्या वादाचा फैसला आता लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून केला जाणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदार त्यांच्यासोबत फुटून बाहेर निघाले होते. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ आणि संसदेत आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करत संपूर्ण शिवसेना पक्षावरच आपला दावा सांगितला होता. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण चिन्ह हे आपल्याला मिळावे, अशी विनंती केली होती.
दुसरीकडे शिवसेनेकडूनही निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात कॅव्हेट दाखल करण्यात आले होते. या सगळ्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोग सक्रिय झाला असून त्यांच्याकडून शिवसेना नेमकी कुणाची याचा सोक्षमोक्ष त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाने दि. ८ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची मुदत दोन्ही गटांना दिली आहे. त्यानंतर निवडणूक आयोग या प्रकरणी सुनावणी करणार असल्याचे समजते.
निवडणूक आयोगाचा कौल काय असणार, यावर उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यास उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह गमवावे लागू शकते. याउलट धनुष्यबाणचिन्ह मूळ शिवसेना पक्ष म्हणजेच उद्धव ठाकरे कडे यांच्याकडे राहिल्यास शिंदे गटाचे भवितव्य धोक्यात येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सरकारमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते.
एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने शिवसेनेत उभी फूट पडल्याचा दावा केला जात आहे. आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, शाखाप्रमुख, जिल्हापरिषद अशा प्रत्येक स्तरावर आमच्याकडे जास्त संख्याबळ असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर शिवसेनेत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रतिनिधी सभेतील दोन तृतीयांश सदस्य आपल्या बाजूला असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात तसे घडल्यास उद्धव ठाकरे मोठ्या अडचणीत येऊ शकतात. गेल्या काही दिवसांत भाजपसोबत राजकीय संसार थाटलेल्या एकनाथ शिंदे गटाकडून प्रत्येक कायदेशीर पाऊल पूर्ण वेळ घेऊन आणि काळजीपूर्वक टाकले जात आहे. आता निवडणूक आयोगापुढे एकनाथ शिंदे आपली बाजू कशी मांडतात, यावर सर्व काही अवलंबून आहे, तर उद्धव ठाकरे शिवसेना आपल्याकडे ठेवण्यासाठी काय करणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
Shivsena Rebel Shinde Group Supreme Court Appeal Demand