मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ता नाट्याचा पुढचा अंक सुरू झाला आहे. आतापर्यंत केवळ बंडखोरांची जुळवाजुळव सुरू होती. शिवसेनेत बंडखोरी केलेले मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आता ४५ पेक्षा अधिक आमदार झाले आहेत. त्यामुळेच शिंदे यांनी आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान देणे सुरू केले आहे.
उद्धव यांनी बोलवलेल्या बैठकीला जे आमदार उपस्थित राहिले नाहीत त्यातील १२ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र शिवसेने विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे दिले आहे. यापूर्वीच शिवसेनेने शिंदे यांची गटनेते पदावरुन हकालपट्टी करीत अजय चौधरी यांची नियुक्ती केली आहे. त्याचे पत्र झिरवाळ यांनी स्विकारले आहे. तर, शिंदे यांनी दिलेले पत्र झिरवाळ यांनी नाकारले आहे. त्यामुळे आता १२ आमदारांवर कारवाई होणार का, याकडे सगळ्यांटे लक्ष लागले आहे. त्यातच शिंदे यांनी आता आक्रमक भाषा वापरण्यास प्रारंभ केला आहे.
१२ आमदारांच्या कारवाईबाबत शिंदे यांनी आक्रमक प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय?
तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे यापुढील काळात उद्धव आणि शिंदे गट यांच्यात चांगलाच संघर्ष पहायला मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
shivsena rebel open challenge to udhhav thackeray on 12 mla action maharashtra political crisis