नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणकी एक मोठा धक्का शिवसेनेला दिला आहे. आमदारांपाठोपाठ खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन करण्यात आला आहे. १२ खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आज येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचा खुलासा केला आहे. मात्र, यावेळी शिंदे गटाचे गटनेते तथा खासदार राहुल शेवाळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
पत्रकार परिषदेत शेवाळे म्हणाले की, भाजपसोबत पुन्हा युती व्हावी अशी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचीच इच्छा होती. गेल्यावर्षी जूनमध्ये दिल्लीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यात पुन्हा युती करण्याबाबत चर्चा झाली होती. तसेच, शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार बाहेर पडले त्यावेळी उद्धव यांनी २१ जून रोजी वर्षा या निवासस्थानी सर्व खासदारांची बैठक घेतली होती. त्यात उद्धव ठाकरे म्हणाले होते की, भाजपने जर शिंदे यांना मुख्यमंत्री केले तर नक्कीच मी तुमच्या भूमिकेचे स्वागत करेन, असे स्पष्ट केले. त्यावेळी बैठकीला खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अन्य खासदारही उपस्थित होते. मी माझ्यावतीने प्रयत्न करीत आहे तुम्हीही करा असे त्यांनी सांगितल्यानेच आम्ही तयार झालो, असे शेवाळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिंदे यांच्या बंडखोरीमागे उद्धव हेच असल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केल्याने आता पुन्हा नव्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
हे खासदार फुटले
मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात इतर मागास वर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाबाबत होणाऱ्या सुनावणी संदर्भात वकील, विधीज्ञ आणि तज्ज्ञांची भेट घेऊन सखोल चर्चा केली. तसेच, लोकसभेत गटनेते व पक्ष प्रतोद बदलण्यासंदर्भात आज झालेल्या निर्णयाविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शिंदे बोलत होते. यावेळी खासदार सर्वश्री राहूल शेवाळे, डॉ.श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे, सदाशिवराव लोखंडे, कृपाल तुमाने, भावना गवळी, प्रतापराव जाधव, संजय मंडलीक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे, राजेंद्र गावीत उपस्थित होते. या १२ खासदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली असून त्यांनी आता शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
Shivsena Rebel MP Rahul Shewale Claim Delhi Press Conference Eknath Shinde