अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
संपूर्ण राज्याचे लक्ष आज मनमाड या शहराकडे लागले आहे. निमित्त आहे ते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे. याच भागाचे लोकप्रतिनिधी आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहोत. बंडखोरी केल्यानंतर कांदे यांची ठाकरे यांच्याशी ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, शिवसैनिकांमध्ये बळ निर्माण करण्यासाठी ठाकरे यांचा दौरा असून याच दौऱ्यावेळी कांदे सुद्धा शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
बंडखोर आमदार सुहास कांदे आपल्या ४ ते ५ हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरे यांना निवेदन देणार आहेत. त्यासाठी सर्व कार्यकर्ते मनमाड येथील सगळे लॉन्स येथे जमणार आहे. निवेदनात आदित्य ठाकरे यांना काही प्रश्न विचारण्यात आले असून त्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देण्यात यावे असे म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांना निवेदन देण्यात येणार असल्याबाबत पोलीस निरीक्षक मनमाड यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
कांदेंच्या निवेदनातील १० प्रश्न असे
– हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. आणि त्याच हिंदुत्वाला विरोध करणारे व देश द्रोह्यांना मदत करणारे नवाब मलिक ज्यांचे नाव १९९३ च्या बॉम्ब स्फोट प्रकरणाशी जोडले गेले त्या नवाब मालिकांशी आपण मांडीला मांडी लावून कसे बसायचे?
– १९९३ च्या बॉम्ब स्फोटातील दोषी याकुब मेमेन याचेशी संबंध असतेते व याकुब मेमेनची फाशी रद्द करण्यात यावी असे पत्र देणारे अस्लम शेख यांच्या सोबत आपण मांडीला मांडी लावून कसे बसायचे?
– शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांना टी बाळू म्हणणारे व त्यांना जेल मध्ये टाकणाच्याशी आपण मांडीला मांडी लावून कसे बसायचे? तसेच माझ्या मतदार संघातील मनमाड शहरासाठी करंजवन पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाकडून १५ टक्के स्वनिधी मिळावा, योजनेचे सर्वेक्षण करण्यात यावे यासाठी मी एकनाथ शिंदे साहेबांकडे पाठपुरावा करत असताना त्याकामी मदत व्हावी म्हणुन आपल्या भेटण्यासाठी आपल्या भेटीची वेळ मिळाची, करंजवन योजनेसाठी शिंदे साहेबांसोबत एकत्रित बैठक घेण्यात यावी यासाठी आपल्याला अनेक वेळा विनंती केली परंतु आपण एकदाही मला वेळ दिली नाही किंवा बैठक घेतली नाही.
– मनमाड शहरात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी निधीची मागणी केली असता आपण निधी का दिला नाही?
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली असता आपण निधी का दिला नाही?
– मनमाड शहरातील रामगुळणा नदी येथे मुंबईच्या धर्तीवर पर्यटन स्थळ विकसित करणेसाठी निधीची मागणी केली असता आपण निधी का दिला नाही?
– मनमाड करांसाठी मोठे वाचनालय व अद्ययावत व्यायामशाळा उभारण्यासाठी निधी मागणी केली असता आपण निधी का दिला नाही?
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून ७/१२ उतारा कोरा का केला नाही?
– मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही?
ओ.बी.सी. ना राजकीय आरक्षण का दिले नाही?
शेतकऱ्यांचे लाईट बिल माफ का केले नाही?
– राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे मोठे स्मारक व्हावे ह्यासाठी आपल्याला वेळोवेळी ५० पत्रे दिलीत, त्यासाठी आपण निधी का दिला नाही?
आ. निलेश राणेंच्या विरोधात फक्त मी एकटा सभागृहात बोललो परंतु माझी पाठ सुध्दा थोपटली नाही.
हे सर्व निधी सन्मानीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना T. बाळू म्हणणाऱ्या लोकांना आपण दिलेले आहेत, आणि मी हे पुराव्या निशी आपणा समोर स्पष्ट करू शकतो,
वरील निवेदन ४ ते ५ हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात येणार आहे. आमदार कांदे निवेदन देण्यासाठी आदित्य ठाकरे यांना भेटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Shivsena Rebel MLA Suhas Kande Wil Meet Aditya Thackeray Today Manmad