मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आम्ही गद्दारी केली नाही. पक्षातून फुटलो नाही तर नेत्या विरोधात उठाव केला आहे. तुमचे नेतृत्व आम्हला मान्य नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी शिवसेना नेतृत्वाला मनमाड येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आव्हान दिले आहे. आज, उद्या आणि भविष्यात ही शिवसेनेत राहणार असल्याचे सांगून त्यांनी पुढच्या निवडणुकीत जे उमेदवार उभे करू त्यांचे चिन्हं धनुष्यबाण असेल आणि कायद्याने असेल असे सांगितले. यावेळी त्यांनी आम्हीच मूळ शिवसेना आहोत. गद्दार म्हणायला आम्ही पक्ष सोडून गेलेलो नाही असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे मनमाडमध्ये शिवसंवाद कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी आ. कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्यात जाऊन त्यांना निवेदन देण्याचे जाहीर केले होते. पण, पोलिसांनी परवाणगी न दिल्यामुळे त्यांनी दुसरीकडे आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी टीकेला जोरदार प्रत्त्युत्तर दिले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससोबत जाण्यासाठी युती केली नव्हती. आम्ही उठाव केला. त्यात, पहिला क्रमांक एकनाथ शिंदे यांचा होता तर चौथा क्रमांक माझा होता असे सांगितले.
या मेळाव्यात त्यांनी मातोश्री बद्दल आजही आदर आहे. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी अपशब्द बोलणार नाही याची आम्ही शपथ घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसने अन्याय केला. राष्ट्रवादी आमचा खून करायला निघाली, तरी उध्दव ठाकरे काही बोलायला तयार नाही, इतका उध्दव ठाकरेंवर काँग्रेस, राष्ट्रवादीचा दबाव असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली.
आदित्य ठाकरे तयार असतील तर अजूनही त्यांना भेटायला तयार- आ. कांदे
मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलतांना आ. सुहास कांदे म्हणाले की, पोलिसांनी परवानगी दिली आणि आदित्य ठाकरे तयार असतील तर अजूनही त्यांना भेटायला तयार आहे. येवल्याला जाऊन त्यांची भेट घेईन, त्यांना माझे प्रश्न विचारेन. आम्ही पाठीत खंजीर खुपसलेला नाही, आमच्या पाठी पाहून घ्या. शिवसेना प्रोटोकॉल पाळणारा पक्ष आहे. संपर्कप्रमुखाकडे दोन वेळा निरोप दिला अजून निरोप आला नाही. आदित्य ठाकरे माझ्या मतदारसंघात आले, त्यामुळे मातोश्रीवर भेटण्याचा मुद्दा नाही. आमदार या नात्याने मी मतदारसंघाचा प्रथम नागरिक आहे, मला मेळाव्याला बोलावले असते तर मी गेलो असतो. धनुष्यबाण चिन्ह आमचेच आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षात जी परिस्थिती उद्धवली तीच शिवसेनेत आहे. पक्षात उभी फूट, विधानसभा लोकसभा मध्ये मध्ये दोन तृतीयांश बहुमत आमच्या बाजूने असल्याने आमची खरी शिवसेना असल्याचेही त्यांनी सांगितले.
Shivsena Rebel MLA Suhas Kande on Aditya Thackeray Manmad