मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय नाट्याला आता आणखीनच वेगळे वळण मिळत आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे ५० पेक्षा जास्त आमदार गुवाहाटी येथे मुक्काम ठोकून आहेत. त्या सर्वांना भाजपचा पाठिंबा आणि सहकार्य मिळत असल्याचे बोलले जात असतानाच आता हे सर्व बंडखोर आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कायदेशीरदृष्ट्या आणि अन्य बाबी पाहता याय बंडखोरांसाठी हा जवळचा पर्याय आहे.
शिंदे गटाकडे सध्या सेनेचे ३८ आमदार आहेत. त्याशिवाय त्यांच्याकडे ९ अपक्ष आणि ३ अन्य पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. सेनेच्या बंडखोरांमध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे. परंतु यापुढील पाऊल या सर्व बंडखोरांना अतिशय विचारपूर्वक उचलावे लागणार आहे. कारण, यात अनेक कायदेशीर बाबी आहेत. त्यांच्यावर होणारी कथित निलंबनाची कारवाई किंवा विधानसभेचे सदस्य रद्द होणे यांचा समावेश आहे. स्वतंत्र गट स्थापन केला तरी त्याला कितपत कायदेशीर आधार आहे, हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे.
हिंदुत्वाचा विचार करता हे सर्व आमदार भाजपामध्ये प्रवेश करतील किंवा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेत सामील होण्याचाही पर्याय आहे. पण, प्रहार त्यांच्यासाठी योग्य पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आता या सर्वांसमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाट आहे. कारण, राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत. यापूर्वी ते सेनेतच होते. उद्धव यांच्याशी जमत नसल्यानेच त्यांनी मनसेची मूहूर्तमेढ रोवली आहे. आताही बंडखोर आमदारांचे उद्धव यांच्याशीच जमत नाहीय. त्यामुळे बंडखोरांना अत्यंत जवळचा पर्याय हा मनसेचा आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेची जवळीक वाढल्याचे देखील दिसून येत आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये तशा घडामोडी घडल्या तर आगामी काळातील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये अभूतपूर्व असा बदला झालेला दिसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सूरत किंवा बडोद्यात बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत शिंदे गट मनसेत प्रवेश करु शकतो का, या दृष्टीने चर्चा झालेली असावी, त्यातच कायदेशीर लढाईत वेळ लागू शकतो. ही बाब लक्षात घेऊन बंडखोर आमदार मनसेत प्रवेश करुन भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात, अशीही शक्यता वर्तवल्या जात आहेत. कारण भाजपमध्ये जाण्याऐवजी मनसेत प्रवेश करुन भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली जास्त संयुक्तिक असू शकतात. कारण मनसे हा शिवसेनेतच फुटून बाहेर पडलेला पक्ष आहे.
शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विचारधारा ही एकच आहे. त्यामुळे भाजप मध्ये जाण्याऐवजी मनसेत जाणे केव्हाही योग्य राहील, असेही काही बंडखोर आमदारांचे मत असल्याचे सांगण्यात येते. याउलट मनसेऐवजी भाजपचीच जवळीक ठेवावी, असे काही बंडखोरांना वाटत असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे आता नेमके काय होईल याबाबत सार्यांनाच उत्सुकता लागून आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आहे. राज यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रीया झाली आहे. तब्ब्येतीची विचारपूस करण्यासाठीच शिंदे यांनी राज यांना फोन केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये नक्की काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तब्ब्येतीच्या बहाण्याने अन्य चाचपणीसााठीही शिंदेंनी राज यांच्याशी संपर्क केल्याचे सांगितले जात आहे.
shivsena rebel mla maharashtra navnirman sena option maharashtra political crisis