पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे बंडखोर नेते आणि सत्ता स्थापनेसाठी भाजपसोबत हातमिळवणी करणारे एकनाथ शिंदे यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिंदे यांच्या शैक्षणिक प्रवासाविषयी शंका उपस्थित झाली आहे. याप्रकरणी येथील न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात एकनाथ शिंदे यांनी दोन शपथपत्रांत १९८१ मध्ये दोन वेगवेगळ्या शाळांमध्ये ११ वी पास झाल्याचे नमूद केले आहे.
शिंदे यांचा जन्म दि. ९ फेब्रुवारी १९६४ रोजी सातारा येथे झाला. एकनाथ शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश हायस्कूल ठाणे येथे झाले. तर त्यानंतरचे शिक्षण मंगला हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे येथे केले. सुरुवातीला एकनाथ शिंदे हे ठाण्यात ऑटो चालवायचे. त्यानंतर आनंद दिघे यांच्या प्रभावाने त्यांनी १९८० मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.
निवडणुकीत उमेदवारी अर्जाबरोबर आपली मालमत्ता व शैक्षणिक अर्हतेविषयी शपथपत्र सादर करावे लागते. याबाबत अभिजित खेडकर आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी खासगी याचिका दाखल केली आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्या निवडणूक शपथपत्रात अनेक तफावती असल्याचे म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी २०१९ च्या प्रतिज्ञापत्रात उच्चतम शैक्षणिक अर्हतेत ते न्यू इंग्लिश हायस्कूल, ठाणे येथून १९८१ मध्ये ११ वी पास असल्याचे नमूद केले आहे, तर २००९ उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी उच्चतम शैक्षणिक अर्हतेत मंगला हायस्कूल ठाणे (पूर्व ) येथून १९८१ मध्ये ११ वी पास असल्याचे नमूद केले आहे.
एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ ठाण्यातील कोपरी-पाचपखाडी असून ते चार वेळा आमदार म्हणून शिवसेना पक्षामधून निवडून आले आहेत. तसेच त्यांची घोषित संपत्ती मध्ये जंगम मालमत्ता : ९७ लाख १४ हजार ७१० रुपये तर स्थावर मालमत्ता : ४ कोटी ४७ लाख ५० हजार रुपये. तर कर्ज : तीन कोटी २० लाख ६४ हजार १९५ रुपये आहे. पत्नी लता शिंदे यांच्या नावे जंगम मालमत्ता : १ कोटी १३ लाख ४७ हजार ७५६ रुपये, स्थावर मालमत्ता : ४ कोटी ९८ लाख रुपये. कर्ज : ५३ लाख ९६ हजार ६६ रुपये.
शिंदे यांच्या नामनिर्देशन अर्जात अनेक तफावती आहेत. एकनाथ शिंदे यांनी सन २०१४ व २०१९ मध्ये निवडणुकीकरिता दिलेल्या नामनिर्देशन अर्जात अनेक तफावती दिसून येत आहेत. २०१४ च्या शपथपत्रात त्यांनी पत्नीकडे वाणिज्य इमारत नसल्याचे नमूद केले आहे, तर २०१९ च्या शपथपत्रात त्यांच्या पत्नीने वागळे इस्टेट येथील दुकानाचा गाळा २० नोव्हेंबर २००२ रोजी खरेदी केल्याचे नमूद केले आहे.
Shivsena Rebel MLA Eknath Shinde Educational information controversy