मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आसाममधील गुवाहाटी गाठले आहे. गेल्या चार दिवसांपासून ते सध्या तेथे आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील या बंडखोरांची आज दुपारी बैठक झाली. त्यानंतर याच बंडखोर आमदारांपैकी एक असलेल्या दीपक केसरकर यांनी आज माध्यमांशी गुवाहाटीमधूनच संवाद साधला.
केसरकर म्हणाले की, आम्ही शिवसैनिकच आहोत. आणि शिवसेनेतच आहोत. आम्ही कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही की करणार नाही. आम्ही हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत. त्यामुळे आम्हाला कुठल्याही पक्षात जाण्यामध्ये स्वारस्य नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीबरोबर जायचे नाही, हेच आमचे निश्चित आहे. शिवसेनेचे ५५ आमदार आहेत. त्यातील ५० आमदार आम्ही सोबत आहोत. त्यामुळे आम्हीच शिवसेना आहोत. म्हणूनच एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरुन काढून टाकण्याचा निर्णय हा अत्यंत चुकीचा आहे. यासंदर्भात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
केसरकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निवळली की आम्ही सर्व आमदार महाराष्ट्रात येणार आहोत. आम्ही आजही शिवसेनेचे सदस्य आहोत. आम्ही कुणीही सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. संख्याबळ अधिक असल्याने स्वतंत्र गट स्थापन करण्याचा आम्हाला कायदेशीर अधिकार आहे, असेही त्यांनी सांगितले.
https://twitter.com/ANI/status/1540651861325541376?s=20&t=KcDnj2Dpfzffk3eDGcHHDg
shivsena rebel mla deepak kesarkar press conference Maharashtra Political Crisis