मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – गेल्या पाच दिवसांपासून गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणाऱ्या बंडखोर आमदारांमध्ये वादावादी झाल्याची बाब पुढे आली आहे. बंडखोरी करतेवेळी काहीसा उत्साह होता. मात्र, आता या आमदारांना घराची, कुटुंबाची आणि मतदारसंघाची आठवण येऊ लागली आहे. यातूनच त्यांचा संयम सुटत असल्याचे बोलले जात आहे. यातूनच काही आमदारांमध्ये वादविवाद झाल्याचे सांगितले जात आहे. याची तत्काळ दखल घेत बंडखोरांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी शांततेचे आवाहन केले आहे.
बंडखोरीमुळे शिवसैनिक संतप्त झाले असून त्यांनी बंडखोर आमादारांचे कार्यालय लक्ष्य करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळेही काही बंडखोरांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण झाला आहे. आपल्या कुटुंबाच्या जिवीताला असलेला धोका लक्षात घेऊनही बंडखोर आमदारांचा संयम संपत आला आहे. यातूनच काही कुरबुरी आणि वादावादी झाल्याचे सांगितले जात आहे. तसा दावा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून करण्यात आला आहे.
सर्व आमदारांची अद्यापही एकजूट असून कोणत्याही प्रकारे वादावादी झाली नसल्याचे शिंदे यांच्यावतीने सांगितले जात आहे. गुवाहाटीच्या हॉचटेलमध्ये सध्या जवळपास ४० बंडखोर आमदार आहेत. या सर्वांना अधिक दिवस एकत्र ठेवणे शक्य नसल्याचेही बोलले जात आहे. राजकीय डावपेच लांबले तर बंडखोरांमधील एकजुटीत फूट पडण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने शिंदे यांची कसोटी सुरु आहे.
राज्यात राजकीय घडामोड सुरु असताना गुवाहाटीत थांबलेल्या बंडखोर आमदारांचा मुक्काम आणखी 3 दिवसांनी वाढवण्यात आला आहे. राज्यात सुरु असलेल्या घडामोडी आणि आमदारांची सुरक्षितता पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितण्यात येते. त्याचप्रमाणे
आतापर्यंत या हॉटेलचे 27 जूनपर्यंत बुकिंग होते. मात्र आता 30 जूनपर्यंत रेडिसन हॉटेलमध्ये बुकिंग करण्यात आले आहे. मात्र आमदार 30 जूनपर्यंत राहणार आहेत की नाही, याबाबत कोणतीही खात्री देण्यात आलेली नाही.
कायदेशीर लढाई, उपाध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव, इतर पक्षांसोबत चर्चा या सर्व प्रक्रियेला वेळ लागणार असल्याचे बोलले जाते. सत्तासंघर्षाच्या काळात मुंबईतही खलबते सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विभागप्रमुख ते राष्ट्रीय कार्यकारणी अशा बैठकांची मालिका लावली आहे. तसेच दुसऱ्या बाजूला बंडखोर गटाच्या अनेक गुप्त बैठका होत आहेत. तसेच दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही राज्यात या क्षणी येणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता बंडखोर आमदार आणखी काही दिवस गुवाहाटीतच मुक्कामी राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
shivsena rebel mla conflict in guwahati hotel maharashtra political crisis