मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीचे मुख्य कारण हे अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाची कारवाई हे आहे. त्यामुळेच बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या तंबूत दिवसेंदिवस संख्या वाढतेच आहे. शिंदेंच्या गटात सामील झालेले तीन नेते हे कारवाईच्या जाचाला त्रासले आहेत. ते नेमके कोण हे आपण पाहूयात.
शिंदे गटाने बुधवारी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये प्रताप सरनाईक हे सक्रिय दिसत आहेत. १७५ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी सरनाईक यांची चौकशी सुरू आहे. मुंबईतील ओवळा-माजिवडा येथील ते आमदार आहेत. विशेष म्हणजे सरनाईक हे पहिले नेते होते ज्यांनी जाहीरपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपसोबतचा तणाव संपवण्यास सांगितले होते. त्यांनी उद्धव यांना लिहिलेले पत्रही चांगलेच व्हायरल झाले होते. ठाण्यातील रिअल इस्टेटचे मोठे खेळाडू अशीही सरनाईक यांची ओळख आहे. ईडीने सरनाईक यांची तब्बल ११ कोटी ३५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांनी बंडखोरी केली आहे. त्यांचे पती यशवंत जाधव हे बृहन्मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती आहेत. यशवंत जाधव यांच्याविरुद्ध ईडीच्यावतीने फेमाच्या कथित उल्लंघनाशी संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्याचवेळी, ईडीच्या तपासापूर्वी आयकर अधिकाऱ्यांनी करचुकवेगिरीच्या आरोपाखाली वांद्रे येथील जाधव कुटुंबाचा फ्लॅट आणि यशवंत यांच्या जवळपास ४० मालमत्ता जप्त केल्या आहेत.
सेना खासदार भावना गवळी या सुद्धा शिंदे गटाच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, शिंदे गटाने उपस्थित केलेल्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. गवळींविरुद्ध मनी लाँड्रिंगचा तपास सुरू आहे. त्यांचा एक जवळचा सहकारी सईद खान याला ईडीने अटक केली आहे. यासोबतच त्यांची ३.७५ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
shivsena rebel leaders crore property seized by agencies Maharashtra Political crisis ed income tax mp bhavna gavli mla yamini jadhav mla pratap sarnaik