मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान देणारे शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे यांंची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र, शिंदे यांनी एकदा चक्क राजकारणच सोडून दिले होते हे तुम्हाला कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप घडविणाऱ्या शिंदे यांच्या जीवन प्रवासाविषयी आपण आता जाणून घेणार आहोत…
राज्यात राजकीय भूकंप घडवून आणणारे बंडखोर शिवसैनिकांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यात एक क्षण असा आला, जेव्हा ते पूर्णपणे कोलमडून गेले होते. राजकारणासह सर्व काही सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता, ही घटना सुमारे २२ वर्षांपूर्वी आजच्या जून महिन्यात घडली होती. सातारा जिल्ह्यातील तापोळा येथील तलावात बोट दुर्घटनेत त्यांच्या मुलाचा आणि मुलीचा डोळ्यासमोर बुडून मृत्यू झाला. परंतु त्यांचे राजकीय गुरू, शिवसेनेचे दिग्गज नेते आनंद दिघे यांनी त्यांना पुन्हा राजकारणात आणले.
शिंदे यांचा जन्म दि. ९ फेब्रुवारी १९६४ रोजी सातारा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव संभाजी नवलू शिंदे त्यांचा विवाह लता एकनाथ शिंदे यांच्याशी झाला, त्या एक व्यावसायिक महिला आहेत त्यांना श्रीकांत शिंदे नावाचा मुलगा असून तो सध्या खासदार आहे. एकनाथ शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश हायस्कूल ठाणे येथे झाले. तर इयत्ता 11वीपर्यंतचे शिक्षण मंगला हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे येथे केले. सुरुवातीला एकनाथ शिंदे हे ठाण्यात ऑटो चालवायचे. त्यानंतर आनंद दिघे यांच्या प्रभावाने त्यांनी 1980 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. 2001 मध्ये दिघे यांचे निधन झाले, तेव्हा त्यांचा शिवसेनेतील वारसा एकनाथ शिंदे यांनी सांभाळला.
सन 1980 च्या दशकात, एकनाथ यांची शिवसेनेच्या किसाननगरच्या शाखाप्रमुखपदी नियुक्ती झाली आणि तेव्हापासून ते सामाजिक आणि राजकीय विषयांवर पक्षाच्या अनेक चळवळींमध्ये आघाडीवर आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटीशी नोकरी करू लागले, तेव्हा 1980 च्या दशकात, ते शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या संपर्कात आले, तेव्हापासून शिवसेनेत त्यांच्या कारकिर्दीचा आलेख चढता राहिला आहे.
विशेष म्हणजे सन 2014 मध्ये, भाजप-शिवसेना सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर त्यांनी आपला अभ्यास पुन्हा सुरू केला आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मराठी आणि राजकारणात बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) पदवी प्राप्त केली. सन 1997 साली ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना नगरसेवकपदाचे तिकीट दिले आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. 2001 मध्ये त्यांची ठाणे महापालिकेत सभागृह नेतेपदी निवड झाली आणि 2004 पर्यंत ते या पदावर राहिले.
सन 2004 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना ठाणे विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. 2005 मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाली. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुका जिंकल्या. सन 2014 च्या निवडणुकीनंतर, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी आणि नंतर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. ऑक्टोबर 2014 ते डिसेंबर 2014 या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.
सन 2014 मध्येच महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती. तर 2019 मध्ये सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण कॅबिनेट मंत्री पद मिळाले. त्यांचा जनतेशी चांगला संपर्क आणि जनसेवेमुळे ते विजयी होऊन ठाण्यात येतात, असेही मानले जाते. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी, शिंदे यांना आशा होती की, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या परंपरेचे अनुसरण करून ठाकरे कुटुंब स्वतः मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होणार नाही. पण आदित्य ठाकरे यांनी स्वतः विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर त्यांची निराशा झाली.
महत्त्वाचे म्हणजे त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या पक्षांशी हातमिळवणी करून उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांना शिवसेनेत आपले भविष्य अंधकारमय दिसू लागले असावे. त्यांच्या बंडाचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे शिवसेना हिंदुत्वाच्या अजेंड्यापासून दूर गेली. सध्या शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाण्यात हिंदूविरोधी रेकॉर्ड आहे. एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची असमर्थता व्यक्त केली असून हेही त्यांच्या बंडखोरीचे कारण असल्याचे मानले जाते.
shivsena rebel eknath shinde life history maharashra political crisis