मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर मृत्यू झालेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना ३ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शहापूर तालुक्यातील कसारा येथील सेना पदाधिकारी भगवान काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. काळे यांच्या कुटुंबियांना ३ लाख रुपयांची मदत करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.
शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर आता मूळ पक्षामधील राज्यभरातील शिवसैनिकांचा लोंढा मुंबईकडे येत होता. बैठका सत्र सुरू असतानाच राज्यभरातून शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवसेना भवन तसेच मातोश्रीवर गर्दी वाढत असतानाच अचानक एका सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या या काळे यांचा मातोश्रीबाहेर रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे काळे कुटूंबियांचा एकमेव आधार हरपला आहे.
ही बाब एकनाथ शिंदे यांना समजताच त्यांनी या पदाधिकाऱ्याच्या कुटूंबियांना ३ लाख रुपयांची मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच शिवसेना ठाणे ग्रामीण सचिव साईनाथ तारे, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना पाठवून काळे कुटुंबाला तातडीची १ लाखाची मदत केली आहे.
शिंदे यांनी स्वतः दूरध्वनी वरून मयत भगवान काळे यांच्या कुटुंबाशी संपर्क केला. अजून दोन लाख रुपये मदत व मुलांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याचे जाहीर केले. तसेच या दुःखद प्रसंगात आपण काळे कुटुंबियांचा सोबत असून त्यांना लागेल ती सर्व मदत करायला तयार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी काळे कुटूंबाला सांगितले आहे.
Shivsena Rebel Eknath Shinde help to Bhagwan Kale whose death outside Matoshri