इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शिवसेनेतून बंडखोरी करुन गुवाहाटी गाठलेल्या आमदारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता थेट प्रभारी विधानसभा सभापती नरहरी झिरवाळ यांच्याकडे रोख वळविला आहे. झिरवाळ यांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. ही बाब शिंदे गटाला पसंत पडलेली नाही. त्यामुळेच शिंदे गटाने आता झिरवाळ यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याची हालचाली सुरू केल्या आहेत.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या बैठकीत उपसभापती नरहरी झिरवाळ यांना हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. बंडखोर गटाच्या ४६ आमदारांच्या स्वाक्षऱ्यांसह प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. तत्पूर्वी, आसाममधील गुवाहाटी येथे तळ ठोकून बसलेल्या शिवसेनेच्या ३७ बंडखोर आमदारांनी गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांना पत्र पाठवून एकनाथ शिंदे हे सभागृहाचे नेते असतील, असे म्हटले आहे. ३७ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले असतानाही झिरवाळ यांनी केवळ १५ ते १६ आमदारांचे समर्थन असलेल्या नेत्याला गटनेते म्हणून कसे नियुक्त केले, असा सवाल बंडखोर गटाने केला आहे.
मात्र, आदल्या दिवशीच नरहरी झिरवाळ यांनी बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची सेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली. शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी शिवसेनेच्या ३७ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र विधानसभा उपसभापतींना पाठवले.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांचे पद सध्या रिक्त आहे. झिरवाळ हे उपाध्यक्ष असून त्यांच्याकडेच सध्या अध्यक्षपदाचा प्रभार आहे.
shivsena rebel eknath shinde group deputy speaker narhari zirwal maharashtra political crisis