इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी मध्यरात्री भेट झाली आहे. या भेटीवेळी अमित शहा हे सुद्धा उपस्थित असल्याची जोरदार चर्चा आहे. बडोद्यात ही गुप्त भेट झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिंदे हे लवकरच भाजपला पाठिंबा जाहीर करू करतील, अशा चर्चांना उधाण आले आहे. दोघांमध्ये काय संभाषण झाले, काय निर्णय झाला हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, भाजपने महाराष्ट्रात शिंदे गटाला सोबत घेऊन सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते.
शिवसेनेच्या ३८ बंडखोर आमदारांसह आसाममधील गुवाहाटी येथे शिंदेंसह त्यांचे समर्थक आमदार तळ ठोकून आहेत. गुवाहाटी येथून शिंदे हे बडोदा येथे चार्टर विमानाने गेले. तेथे भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट त्यांनी घेतल्याचे सूत्रांकडून समजते. देवेंद्र फडणवीस हे रात्री १०.३० वाजता मुंबईहून या बैठकीसाठी निघाल्याची माहिती समोर आली आहे.
दोन्ही नेते चार्टर प्लेनने बडोदा येथे पोहोचल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे गुवाहाटीहून बडोदाकडे रवाना झाले. तर फडणवीस हे मुंबईहून बडोद्याला आले. रात्री दोन वाजता दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाल्याचेही समोर येत आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेचा संपूर्ण प्लॅन ठरल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शिवसेनेनेही शिंदे गटावर कारवाईची तयारी चालवली आहे. शिंदे यांच्यासह १६ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिवसेनेची विनंती उपसभापतींनी मान्य करत, शिंदे गटाला नोटीस बजावली आहे. त्यासाठी बंडखोर आमदारांना उत्तर देण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
shivsena rebel eknath shinde and bjp leader devendra fadanvis meet Maharashtra Political crisis