मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचे, याविषयीचा निर्णय निवडणूक आयोगासमोर लवकरच होणार आहे. मात्र या निर्णयापूर्वीच उद्धव ठाकरे पुन्हा आणखी एक धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांबरोबरच आता इतर राज्यांमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर याचा निश्चितच परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे.
शिंदे गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्राबाहेरील १२ राज्यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. यामध्ये दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, मणिपूर, गोवा आदी राज्यांचे प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये शिवसेना गेल्या काही वर्षांपासून पक्ष विस्तारासाठी प्रयत्नशील आहे.
शिवसेनेच्या विविध राज्यातील प्रदेश प्रमुखांनी बुधवारी भेट घेत या सर्वांनी आम्हाला आपला पाठींबा जाहीर केला. यासमयी संपन्न झालेल्या बैठकीत शिवसेना पक्ष संघटना देशातील कानाकोपऱ्यात वाढवण्यासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. pic.twitter.com/ukrGlb8phO
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 15, 2022
शिवसेना आपलीच असल्याचा दावा
शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आपल्याला द्यावे अशी मागणीदेखील एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर, सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक आयोगाने सुनावणी घेऊ नये अशी मागणीदेखील केली आहे. सुप्रीम कोर्टात शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई करावी यासह इतर मुद्यांवर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाने सुप्रीम कोर्टासमोर निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात २९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
यामध्ये दिल्ली, मणिपूर, मध्य प्रदेश,छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, हैदराबाद, गोवा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि त्रिपुरा अशा एकूण १२ राज्यातील प्रदेश प्रमुखांचा समावेश होता. या सर्व राज्य प्रमुखांना त्यांच्या राज्यात पक्षवाढीसाठी सर्वतोपरी मदत करण्याबाबत आश्वस्त केले. pic.twitter.com/7PNDSoqPC9
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 15, 2022
दसरा मेळावा दणक्यात घेणार
शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून दसरा मेळावा घेण्यात येतो. आता या मेळाव्यावरदेखील शिंदे गटाने दावा केला आहे. शिवसेनेच्या वतीने शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केल्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीदेखील मेळाव्यासाठी मैदानाची मागणी करणारा अर्ज महापालिकेला सादर केला आहे. महापालिका आता कोणाला परवानगी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महापालिका दोन्ही गटांना परवानगी नाकारण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली तर शिवसेना मेळाव्यासाठी पर्यायी जागा शोधणार आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एमएमआरडीएला पत्र लिहीत वांद्रे – कुर्ला संकुलातील मैदानाची मागणी केली आहे.
Shivsena Politics Uddhav Thackeray Eknath Shinde Leaders
Non Maharashtra State Party Activist Rebel Group