मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील संघर्ष कमी होण्याचे नाव घेत नाहीय. आता शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य यांना जबर झटका दिला आहे. आदित्य यांचा मतदारसंघ वरळी आहे. आणि याच मतदारसंघातील तब्बल ३ हजार शिवसैनिक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. दसरा मेळाव्यापूर्वी शिंदे गटाने ठाकरेंना मोठा दणका दिल्याचे बोलले जात आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्याबाबत उद्धव गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. मात्र शिंदे गट ठाकरे कुटुंबाला आपला आनंद साजरा करू देत नसल्याचे दिसून येत आहे. उद्धव यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांना सोबत घेण्याच्या शिंदे गटाची तयारी आहे. त्याआधी ठाकरे घराण्याशी जवळीक असलेल्या चंपा सिंग थापा यांच्याशी शिंदे गटाने संबंध जोडले आहेत.
जूनमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी ३९ जणांसह बंड केले. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत केलेल्या युतीला या आमदारांनी विरोध केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सोबत घेऊन भाजपने सरकार स्थापन केले आहे. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले आहे.
शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. एकीकडे उद्धव गट स्वतःला खरी शिवसेना असल्याचा दावा करतो, तर दुसरीकडे शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहे. दसरा मेळावा साजरा करण्याच्या हक्कावरून दोन गटातील भांडण न्यायालयात पोहोचले आहे. पक्षाच्या स्थापना दिनी दसरा मेळावा साजरा करण्याचा दावा दोन्ही गट करत आहेत. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत मुंबई महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती. अखेर उच्च न्यायालयाने उद्धव यांना परवानगी दिली आहे.
Shivsena Politics Shinde Group Aditya Thackeray
Varali Constituency Mumbai