नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेदरम्यान ‘धनुष्यबाण’ची लढाईही तीव्र होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने संबंधित कागदपत्रे कंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. त्याचवेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी आयोगाकडे ४ आठवड्यांचा वेळ मागितला आहे.
शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर दावा केला असून निवडणूक आयोगासमोर कागदपत्रे सादर केली आहेत. पक्षातील बंडखोरीनंतर शिंदे यांनी जूनमध्ये भारतीय जनता पक्षासोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. त्यानंतर त्यांनी आयोगाला पत्र लिहून धनुष्यबाण चिन्हाचे वाटप करण्याची मागणी केली. याबाबत लोकसभा आणि राज्य विधानसभेत मिळालेल्या मान्यतेचा दाखला या गटाने दिला आहे.
त्यादरम्यान, निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना ८ ऑगस्टपर्यंत विधिमंडळ आणि संघटनात्मक विभागांच्या समर्थन पत्रांसह कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. निवडणूक आयोगाच्या मते, निवडणूक चिन्हे (आरक्षण आणि वाटप) ऑर्डर १९६८ च्या परिच्छेद १५च्या धर्तीवर या मागण्या करण्यात आल्या आहेत.
उद्धव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आयोगाकडे मुदतवाढ मागितली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षण आणि निर्देशांच्या आधारे, आम्ही आयोगाला विनंती केली आहे की शिंदे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कोणताही निर्णय देऊ नये.” हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याचा पाठपुरावा करू नये, असे न्यायालयाने यापूर्वी निवडणूक आयोगाला सांगितले होते.
Shivsena Party Symbol Election Commission Documents
Eknath Shinde Uddhav Thackeray Political Crisis