तिडकेनगर, हेडगेवारनगर, जगतापनगरमध्ये नागरिकांशी संवाद
नाशिक – शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत उंटवाडी, तिडकेनगर, कालिकानगर, हेडगेवारनगर भागात सोमवारी, १२ जुलैपासून समस्या निवारण मोहीम राबविण्यात येणार आहे. घरोघरी जावून नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यात येतील, ते सोडविण्यासाठी संबंधित खात्याकडे शिवसेना पाठपुरावा करणार आहे. यावेळी कोरोना नियमावलीचे पालन करण्यात येईल.
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १२ जुलै ते २४ जुलै या काळात राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत नागरिकांच्या समस्या निवारणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. हेडगेवारनगर, पाटीलनगर, उंटवाडी, तिडकेनगर, कर्मयोगीनगर, जगतापनगर, कालिका पार्क, कालिकानगर या भागात शिवसैनिक घरोघरी जातील, नागरिकांशी संवाद साधतील. वीज, पाणी, घंटागाडी, आरोग्य, वीज वितरण कंपनीशी संबंधित तक्रारी, परिसर स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज, पथदीप, रेशनिंगचे धान्य आदींबाबतच्या समस्या जाणून घेण्यात येतील. संबंधित खात्याशी संपर्क साधून त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष, शिवसैनिक बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, श्रीकांत नाईक, दिग्विजय पवार, संकेत गायकवाड (देशमुख) यांच्यासह शिवसैनिक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. शिवसंपर्क अभियानाअंतर्गत केलेल्या कामाची माहिती जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना देण्यात येणार आहे.