मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता बंडखोर शिंदे गटावर कारवाई करण्यासाठी कठोर पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत चार ठराव मंजूर करण्यात आले आहे. त्यात शिंदे गटावर जोरदार कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी शिंदे यांच्यासह १६ बंडखोरांना नोटीस बजावली आहे. आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यापूर्वी उत्तर देण्यासाठी २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तसेच, एकनाथ शिंदे गटाने त्यांच्या नावात बाळासाहेबांचे नाव घेतल्याने त्या विरोधात शिवसेना निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील राजकीय संकट क्षणोक्षणी वाढत आहे, पण उद्धव हार मानायला तयार नाहीत. त्यांनी आता एकनाथ शिंदे गटाला चांगलाच धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे शिवसेनेने राष्ट्रीय कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांच्याविरोधात चार ठराव मंजूर केले. तर दुसरीकडे विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या पत्राची दखल घेतली आहे. बंडखोरांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी उपसभापतींनी शिंदे गटातील १६ आमदारांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांना सोमवार, २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.
हे चार ठराव असे
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चार ठराव मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी पहिल्या ठरावाअंतर्गत शिवसेना निवडणूक आयोगाकडे जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव इतर कोणीही वापरू नये, अशी मागणी आयोगाकडे केली जाणार आहे. अन्य प्रस्तावांमध्ये उद्धव हे बंडखोरांवर कारवाई करणार आहेत. हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचा ठराव यावेळी संमत झाला आहे. तर, यापुढे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरच विश्वास दाखविण्याचा अंतिम ठराव करण्यात आला आहे.
बापाच्या नावावर निवडणूक लढवा
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. शिंदे यांनी त्यांच्या गटाला बाळासाहेबांचे नाव दिले आहे. त्याची दखल उद्धव यांनी घेतली आहे. ते म्हणाले की, ज्या कोणाला निवडणूक लढवायची असेल त्यांनी आपल्या बापाच्या नावावर निवडणूक लढवावी, असे आव्हान दिले आहे. बाळासाहेब हे माझे वडील असून त्यांचे नाव कोणीही वापरू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले
shivsena national executive committee meet decisions maharashtra political crisis