मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. निवडणूक आयोगाने तसा निर्णय दिला होता. त्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार असून पक्षाचे चिन्ह आणि नाव उद्धव ठाकरे यांना मिळण्याची अपेक्षा असल्याची चर्चा आहे.
वर्षभरापूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडामुळे पक्षात उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी स्वत:सोबत काही आमदार घेऊन सत्ता स्थापन केली. त्यानंतर खरी शिवसेना कुणाची, व्हिप कुणाचा लागू होणार आदींच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. दोन्ही बाजूने घमासान सुरू झाले. सर्वोच्च न्यायालयाने विद्यमान सरकारला फटकारले पण सरकार वाचले. तर दरम्यान निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या बाजूने निकाल देत शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह त्यांना सोपविले. आयोगाच्या या निर्णयाला ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. या याचिकेवर येत्या ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह ठाकरे यांना मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. तसे झाल्यास तो निर्णय ठाकरे गटासाठी समाधानकारकच नव्हे तर बठ देणारा ठरणार आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह दिल्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, विधीमंडळ पक्षातील फुटीला पक्षातील फुट समजणे चुकीचे असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे म्हणणे आहे. यावर ३१ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी सांगितले आहे. या सुनावणीकडे ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांचे लक्ष राहणार आहे.
अशी आहे याचिका
निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना निवडणूक चिन्ह आणि शिवसेना नाव देऊन चिन्ह आदेशाच्या परिच्छेद १५ नुसार दिलेल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे, असा दावा ठाकरे गटाने याचिकेतून केला आहे. आयोगाने विधीमंडळ पक्षातील फुटीला पक्षातील फुट म्हणून स्वीकारणे चुकीचे आहे, असेही ठाकरे गटाने आपल्या याचिकेत म्हटले आहे.