मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक असलेले संजय राऊत हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. विशेष म्हणजे, कोठडीत असताना राऊत यांनी सामनामध्ये लेख लिहिला आहे. ही बाब त्यांना आता चांगलीच महागात पडण्याची चिन्हे आहेत. याप्रकरणी ईडीकडून त्यांची चौकळी होण्याची चिन्हे आहेत.
पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी राऊत यांना अटक करण्यात आली असून सध्या ते तुरुंगात आहेत. राऊत यांचा ‘रोखठोक’ या सदरात लेख प्रकाशित झाला आहे. कोठडीत असताना त्यांनी लेख लिहिला कसा असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच या प्रकरणात खुलासा करताना ईडी अधिकाऱ्यांनी देखील सांगितले आहे की, असे करणे बेकायदेशीर आहे. आता या प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी करण्यात येईल. त्यामुळे राऊतांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
सामनामध्ये राऊत यांचे दर रविवारी रोख-ठोक हे साप्ताहिक प्रसिद्ध होते. राऊत कोठडीत असताना त्यांचा लेख कसा काय छापून आला? असा प्रश्न ईडीच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. यावरून ईडी राऊतांची चौकशी करणार आहे. कारण संजय राऊत हे कोठडीत असताना लेख किंवा कॉलम लिहू शकत नाहीत. न्यायालय त्यांना विशेष परवानगी देईल तेव्हाच ते लिहू शकतात. विशेष म्हणजे कोर्टाकडून त्यांनी अशी कुठलीही परवानगी मागितलेली नाही, की दिलेली नाही. यामुळे राऊत यांनी तुरुंगात असताना लेख लिहिला होता? जर लिहिला तर तो बाहेर गेलाच कसा? याची चौकशी ईडी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आता संजय राऊत यांची रवानगी नवाब मलिक यांच्या शेजारी आर्थर रोड जेलमध्ये होत आहे
अजुन तर पत्रा चाळ घोटाळ्याची चौकशी सुरु झाली आहे. वसई पर्ल ग्रुप घोटाळा, दुबई येथे पंचतारांकित हॉटेल्समध्ये बिल्डर्स सोबत मिटींग्स, चीन यात्रा
सर्व घोटाळ्यांची चौकशी होईपर्यंत मुक्काम लांबणार वाटते pic.twitter.com/cE36FdOEll
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 8, 2022
गुजराती आणि राजस्थानींना हाकलून दिल्यास मुंबईत एकही पैसा शिल्लक राहणार नाही आणि ती यापुढे भारताची आर्थिक राजधानी राहणार नाही, अशा राज्यपालांच्या टिप्पणीबद्दल या कॉलममध्ये टीका करण्यात आली आहे. या स्तंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर टीका करण्यात आली. राऊतच्या अटकेच्या एका दिवसानंतर कोश्यारी यांनी हे वक्तव्य केल्याने ईडीसमोर हा लेख लिहिला कोणी, हे कोडे पडले आहे. आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पत्रा चाळ प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले व ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आली होती. आज त्यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Shivsena MP Sanjay Raut Written Article ED Enquiry
Daily Saamana Custody