मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्राचाळ कथित घोटाळा प्रकरणी १०३ दिवस अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जेलबाहेर आल्यानंतर आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते काय बोलणार, कुणावर टीका करणार, कुणाचे कौतुक करणा, कुणाचे आभार मानणार, काय गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
राऊत म्हणाले की, तुरुंगात मी एकांतात होतो, त्यावेळी खूप विचार केला. तेव्हा विचारात असताना कुणाचा द्वेष करायचा नसतो. परंतु मला जे काही समजत होते, त्यानुसार सध्याच्या सरकारने काही चांगले निर्णय घेतले, याबद्दल मी फडणवीस यांचे कौतुक करतो. मात्र यावेळी त्यांनी टीका करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला. आमचे मित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर टीका करताना राऊत यांना ईडीकडून अटक होईल, त्यांनी एकांतात स्वत:शी बोलण्याची प्रॅक्टिस करावी असे म्हटलं होते मला त्यांना सांगायचे आहे, मला ईडीने जी अटक केली ती बेकायदेशीर होती असे कोर्टाचे म्हणणे आहे. राजकारणामध्ये शत्रूच्याबाबतही आपण असे चिंतू नये की, तो जेलमध्ये जावा. मी एकांतात होतो, जसे सावरकर होते, अटल बिहारी वाजपेयी होते. मी माझा एकांत सत्कारणी लावला, असेही राऊत म्हणाले.
राऊत यांनी आपले जेलमधले अनुभव सांगितले. मला वाटले लोक मला विसरतील, पण कालपासून जे स्वागत पाहतो, त्यावरुन तसे वाटत नाही, मात्र काही लोकांना वाटले, मी जेलमध्ये राहतो म्हणजे मजेत राहत असेल. पण जगातले कोणतेही जेल म्हणजे मजा नसते. जेलमध्ये राहणे फार अवघड आहे.माझी तब्येत जेलमध्येही खराब होती, आत्ताही तशीच आहे. तिथे भिंतींशी बोलावे लागते, एकांतात बोलावे लागते. मी विचार करायचो की सावरकर १० वर्षांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये कसे राहिले असतील, टिळक कसे राहिले असतील, वाजपेयींपासून अनेक जण कसे राहिले असतील ? पण जे खरे राजकारणात असतात, त्यांना कधी ना कधी जेलमध्ये जावेच लागते.
राऊत पुढे म्हणाले की, मी तीन महिन्यांनी हाताला घड्याळ बांधले आहे. लोकांना माझी काळजी आहे, प्रेम आहे. अनेकांचे फोन आले. आज सकाळीच शरद पवारांचा फोन आला. त्यांचीही प्रकृती ठिक नाही. माझे कोठडीतले दिवस खडतर होते. पण मी कायदेशीर बाबींवर जास्त भाष्य करणार नाही. कोर्टाने जी ऑर्डर माझ्या जामिनाबाबत दिली त्यामुळे देशात एक चांगला मेसेज गेला आहे. ज्यांनी हा कट रचला होता त्यांना आनंद झाला असेल तर ठीक आहे. माझ्या मनात कुणाविषयीही तक्रार नाही. माझ्या कुटुंबाने अनेक गोष्टी सहन केल्या.
राजकारणात अशा काही गोष्टी घडतात. मात्र अशा प्रकारचे वाईट राजकारण कधीही देशाने पाहिले नाही असेही राऊत यांनी म्हटले आहे. राजकीय शत्रू असतील तरीही चांगले वागण्याची आपल्याकडे परंपरा आहे. परंतु लवकरच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. यावेळी त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत मोदी आणि शहा यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.
राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले आहे. फडणवीस यांनी मागच्या काळामध्ये काही चांगले निर्णय घेतले आहेत. विशेषतः गरीबांना घर देण्यासंदर्भात आणि ‘म्हाडा’ला अधिकार देण्यासंदर्भात फडणवीस यांनी कौतुकास्पद निर्णय घेतले आहे. असे राऊत म्हणाले. तसेच मी तुरुंगात होतो. तेव्हा फडणवीस म्हणाले होते कटुता थांबली पाहिजे. त्यामुळे फडणवीस यांना भेटले तर गैर काय? असं सांगतानाच भाजपच्या विरोधात लढाई सुरूच राहील, त्याचबरोबर राज्याचा कारभार उपमुख्यमंत्रीच चालवतात, असेही राऊत म्हणाले.
आमची शिवसेना मूळ आहे. पक्षासाठी दहावेळा तुरुंगात टाकले तरी मी जायला तयार आहे. पक्षासाठी त्याग करायची वेळ आल्यावर त्याग करावा लागतो. मला जे काही मिळाले आहे, ते त्यांच्यामुळे मिळाले आहे. आम्ही कितीही मोठे झालो, तरी ज्यांनी दिले, त्या पक्षाशी बेईमानी करणे, पाठीत खंजीर खुपसणे, हे आमच्या रक्तात नाही, असे राऊतांनी ठामपणे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत विचारणा केली असता संजय राऊत यांनी त्यावर थेट बोलणे टाळले. मात्र राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं स्वागत करतो, माझी तब्बेत चांगली असेल तर जरुर मी त्यांच्या यात्रेत सहभागी होईन, त्याबाबत मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेन, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
Shivsena MP Sanjay Raut Press Conference after Came Out From Jail