नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. या भेटीवेळचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याची दखल घेत खासदार राऊत यांनी खुलासा केला आहे. या फोटोमध्ये दिसते आहे की, राहुल गांधी आणि संजय राऊत हे दोन्ही बोलत आहेत. मात्र, राहुल गांधी यांनी राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे. तसेच, गांधी हे काय बोलत आहेत ते अत्यंत बारकाईने राऊत ऐकत आहेत. या फोटोचे विविध अर्थही काढले जात आहेत.
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. म्हणजेच, हे तिन्ही पक्ष एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून सरकार सांभाळत आहेत. एकेकाळचे दोन्ही विरोधक काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र आले. दोन्ही खांद्याला खांदा लावून मार्गक्रमण करीत आहेत. मात्र, आता काँग्रेस नेत्यांनी शिवसेना नेत्याच्या खांद्यावर हात ठेवल्याने ही बाब अनेकांना आश्चर्यजनक वाटत आहे. यासंदर्भात राऊत यांनी म्हटले आहे की, शिवसेना आणि काँग्रेस हे हातात हात घालून काम करीत आहेत. हातातला हात फक्त खांद्यावर आला एवढंच, असं राऊत यांनी म्हटलं आहे.